
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार,माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या बाबतीत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अपशब्द बोलुन जाहीर वक्तव्य केले.त्यांच्या या वक्तव्याचा म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पत्रकार परिषदेत जाहिर निषेध करण्यात आला.तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी शहर संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजीत करून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचा तीव्र शब्दात निषेध केला.या वेळी त्यांचे समावेत
जिल्हा चिटणीस महादेव पाटील,नगरअध्यक्ष अकमल कादिरी, गटनेते संजय कर्णिक,शाहीद उकये,माजी सभापती संदीप चाचले,महीला जिल्हा चिटणीस रेश्मा कानसे,महीला अध्यक्षा सोनल घोले,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,नगरसेविका जयश्री कापरे,नगरसेविका दळवी,नाना सावंत,अनिल बसवत,गजानन पाखड,महेश घोले,किरण पालांडे,नदिम दळवी,प्रकाश गाणेकर,स्वप्नील चांदोरकर,महमद पठाण आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.अधिकपने भुमिका मांडताना समीर बनकर यांनी राज्यात राजकीय सत्तांतर घडल्यापासून महिलांवर बेताल वक्तव्य करणे थांबण्याचे नाव काही घेत नाही.यात अग्रस्थानी सत्ताधारी आमदार व मंत्री आहेत हे आश्चर्याचेच आहे.स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेत आपल्या अ-संस्काराची ओळख महिला लोकप्रतीनिधींबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यांमधून दाखवून देण्याची स्पर्धाच लागली आहे.नुकतेच रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या माजी पालकमंत्री तथा श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार कुमारी आदिती तटकरे यांच्याबद्दल पातळी सोडून टीका केली.आमदार थोरवे यांच्यावर असलेल्या असभ्य व असंस्कृतीचे यातुन दर्शन घडवीत आहे.महिलांचा आदर व सन्मान करण्याचे बालसंस्कार त्यांना कमी पडले होते कि काय ?असा प्रश्न त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावरून नक्कीच उपस्थित होतो.बरं हि या आमदार महोदयाची पहिली वेळ नाही या आधीहि त्यांनी या प्रकारची बरळ ओकून आपल्याला मिळालेले संस्कार चुकीचे आहेत याची जाणीव जनतेला करून दिली होती.राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु एखाद्या व्यक्तीला त्यातही अशी व्यक्ती आमदार आदिती तटकरे या एक तरुणी आहेत आणि किमान दीड ते दोन लाख जनतेचे लोकप्रतिनिधीत्व करतात त्यांच्याबदल असे बोलणे कितपत योग्य आहे असा विचार करण्यास भाग पाडते.
पुरोगामी,सुधारणावादी महाराष्ट्र अशी राज्याची ओळख असली तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत.राज्यात १९७२ ते १९७७ या काळात सर्वाधिक म्हणजे २८ महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही विधानसभा निवडणुकीत इतक्या संख्येने महिला आमदार निवडून आलेल्या नाहीत. असे असताना महिलांना राज्याच्या सत्तेत तर वाटा न देता इतर विरोधी पक्षातील महिला आमदारांना, खासदारांना, नेत्याना टार्गेट करून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचे काम राज्याचे मंत्री व आमदार वारंवार करत आहेत.हे दुर्दैवीच!रायगड जिल्ह्यात अनेक दिग्गज राजकारणी होऊन गेले ज्यांनी आपल्या सुसंस्कृतीचे दर्शन घडविले. सद्याच्या परिस्थितीत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे जिल्ह्यात असलेले प्राबल्य, तालुका ते गाव पातळीवरची माहिती त्याचा अभ्यास, कार्यकर्त्यांची फळी इतर राजकीय नेत्याच्या तुलनेत अधिक आहे. त्यांची जिल्ह्यावर असलेली पकडहि मजबूत असल्याने त्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली असल्याचे चित्र सध्या तरी रायगड जिल्ह्यात पाहायला मिळते. यासाठी त्यांच्यावर वैयक्तिक व राजकीय आरोप केले जातात. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे तीन आमदार तर राष्ट्रवादीचे एक आमदार निवडून आले. संख्याबळ जास्त असताना देखील राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना जिव्हारी लागले. हाच धागा धरून त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सहभागी होत गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळी लावून घेतला. आदिती तटकरे यांनी कमी वयात राज्याच्या मंत्रिमंडळात स्वतःचे स्थान निर्माण करून रायगड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी केलेली मेहनत आणि वाढती लोकप्रियता या जोरावर राज्यात स्वतःचे नावलौकिक केले. कोविड काळात जीवाची पर्वा न करता प्रत्येक आरोग्य केंद्रात भेट देत रुग्णांना धीर देण्याचे काम असू देत कि, चक्रीवादळ असो वा महापूर त्यांनी स्वतः उतरुन रात्रंदिवस एक करत शासन व प्रशासन यामध्ये ताळमेळ जमवत गरजूंपर्यंत मदतकार्य पोहचविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. जिल्ह्यातील राजकारणातून तटकरेंना हद्दपार करून जिल्ह्यात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचे दिवास्वप्नं सेनेच्या (शिंदे गटाच्या) तिन्ही आमदारांना सत्तांतर झाल्यापासून पडत आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी सुनील तटकरे यांचे जिवलग मित्र सुरेश लाड यांचा बालेकिल्ला होता. खा. तटकरे यांना कर्जत -खोपोली या भागात मानणारा मोठा वर्ग आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश लाड यांचा पराभव झाल्याने येथील पकड सैल झाली होती. परंतु खा. तटकरे यांनी पुन्हा याभागात मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत “तटकरे पॅटर्न” मध्ये आपला जमाव लागणार नाही याची कल्पना आल्यानेच वारंवार खासदार सुनील तटकरे यांच्यासह माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे यांच्यावर टीका करून प्रसिद्धी झोतात राहण्याचे काम कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे करत आहे.
उच्च शिक्षित असलेल्या आदिती तटकरे यांनी आपल्या रायगड जिल्हा पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेली ठळक कामे पहाता रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु केले,महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफ बेस कॅम्प उभारणे,अलिबाग येथील किहीम या गावी डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र,रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालयास मान्यता,माणगाव येथे ट्रामा केअर युनिट उभारण्यास मान्यता,माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल व युवा वसतिगृह स्थापन करण्यास शासनाची मान्यता,सुधागड (पाली) येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारत,पोलीस विभागास सक्षम करणेसाठी वाहन उपलब्ध करून दिले,तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय (निवास्थान) बांधकाम करणेबाबत मान्यता
एवढेच नाही तर आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात उद्योग, पर्यटन,फलोत्पादन,क्रीडा,विधी व न्याय अशा विविध खात्याच्या राज्यमंत्री म्हणून अनेक शासकीय योजना व उपक्रम राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे पाऊल उचलले. विधीमंडळ पातळीवर संख्यात्मक कामगिरीपेक्षा गुणात्मक कामगिरी अधिक महत्वाची या निकषावर स्वतःला “अद्वितीय आदिती” म्हणून सिद्ध केले.संत तुकडोजी महाराज म्हणतात,जर स्त्रीची उपेक्षा केली तर समाजाची दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही.स्त्रीचं आयुष्य चूल आणि मूल इतकंच आहे.aयामुळे स्त्रीला कमी लेखलं जातं आहे.२१ व्या शतकातदेखील याचा प्रत्यय आजच्या राजकारण्यांकडून वारंवार केला जातो. राजकारण्यांकडून महाराष्ट्र सारख्या सुसंस्कृत अशा पुरोगामी राज्यात विशेषतः सत्ताधारी भाजप व शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून सहकारी महिला आमदारांबद्दलच अशी टिप्पणी होणे सहन न होणारी आहेत. महिला सशक्त आणि बलवान होत आहेत. अशावेळी त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न होणे हे अमान्य आहे. आज बदलत्या काळानुसार समाजाची विचारसरणी बदलत चालल्यामुळे एकीकडे स्त्रीया प्रगती करू पाहत आहेत, प्रगतिपथापर्यंत पोहोचत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत.स्त्रीला मातेसमान मानणारी पिढी होती, त्याच पिढीचं आज भयावह प्रकारात परिवर्तन झालं आहे. त्याला कारणीभूत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत असलेले अपयश आहे. राज्यातील सत्ताधार्यांना “हम करे सो कायदा” अशी वृत्ती कारणीभूत आहे. कायद्याचा धाक या लोकप्रतिनिधींना नसल्यासारखे त्यांचे वागणे झाले आहे. मुख्यमंत्री असो व गृहमंत्री आपल्याच खिशात अशी काही आमदारांची वागणूक झाली आहे.अशा लोकांना लगाम घालण्यात राज्याचे प्रमुख अपयशी होताना दिसत आहे.सत्तेच्या लालसेपोटी अशा लोकांचा सांभाळ करणे त्यांना प्राधान्य वाटते याचे आश्चर्यच..
आमदार महेंद्र थोरवे यांनी महिला लोकप्रतिनिधींबद्दल काढलेली मुक्ताफळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गौरवशाली महाराष्ट्रात कदापि खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी तात्काळ माफी मागत यावर आपली चूक मान्य करणेच त्यांच्यासाठी शहाणपणाचे ठरेल.