
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
वेळ सायंकाळी पाचची . आमचे चुलते विठ्ठलराव जोगदंड शेतात काम करत असताना त्यांचा पाय एका परडावर पडला. तसा तो परड पाय पडताच चवताळून कडाडून जवळपास इतभर पायाची फेंडरी फोडली. चुलत्याने हिम्मत करून परडाला मारले . फेंडरी फोडली असतानाही रक्तबंबाळ झालेल्या पायाने त्या परडाला पिशवीत घेवून त्याच वेळी एकटेच डॉ. पुंडे यांचा दवाखाना गाठला. झालेली हकीकत नंतर आम्हा सगळ्या परिवाराला कळाल्यानंतर आम्ही दवाखान्यात पोहचलो. डॉ. दिलीप पुंडे यांनी योग्य उपचार करून आमच्या चुलत्यास मरणाच्या दाढेतून वाचवून घेतले. असे जवळपास सात हजारच्यावर सर्पदंश झालेले रुग्ण त्यांनी वाचवले आहेत. गेल्या ३५ वर्षा पासून ते आरोग्य व सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. या प्रदीर्घ रुग्ण सेवेनंतर आता त्यांचे चिरंजीव डॉ. गौरव व सूनबाई डॉ. तेजस्विनी पुंडे हे नवदाम्पत्य नव्यानेच मुखेड येथील ‘ पुंडे हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक हृदयरोग विभाग सुरु करून रुग्ण सेवेसाठी कार्यरत होणार आहेत. त्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा उद्घाटनाचा कार्यक्रम दि. ६ एप्रिल गुरुवारी संध्याकाळी ६ .०० वा. संपन्न झाला. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार किशनराव राठोड तर उद्घाटक म्हणून विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार राम पाटील रातोळीकर , माजी आ. अविनाश घाटे , माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर , माजी नगराध्यक्ष , बाबुराव देबडवार , शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथ लोहबंदे , श्रीमती विजयाताई देशपांडे , डॉ. व्यंकट सुभेदार , डॉ. अंकुश देवसरकर डॉ. राहुल मुक्कावार , डॉ. अशोक कौरवार , सरपंच वसंतराव गायकवाड , अनिल कोल्हे , मैनोदीन पिजारी , संयोजक डॉ. दिलीप पुंडे , सौ.माला पुंडे , डॉ. गौरव पुंडे , डॉ. तेजस्विनी पुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते अत्याधुनिक हृदयरोग विभागाचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे हृदयरोगाचे निदान लवकर लावता येईल आणि उपचार जलद गतीने झाल्यामुळे आधिकाधिक रुग्णांना हृदयरोगापासून जीवदान मिळेल. असे विचार त्यांनी उद्घाटनपर भाषणात बोलताना व्यक्त केले. यानंतरच्या भाषणात उपस्थित सर्व मान्यवर वक्त्यांनी या अत्याधुनिक सुविधेबदल आणि डॉ. दिलीप पुंडे यांच्या रुग्णसेवा व सामाजिक ‘ सांस्कृतिक कार्याबदल गौरव उद्गार काढले. आता वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून डॉ. गौरव व डॉ. तेजस्विनी हे दोघेही रुग्ण सेवेचा व सामाजिक कार्याचा वसा यशस्वी पार पाडतील याबदल सर्वांनी खात्री बाळगली. हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे . हसणाऱ्या चेहर्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते … ते हृदय या डॉ. पुंडे परिवाराकडे आहे. मराठवाड्यातील मुखेड मधील डॉ. दिलीप पुंडे म्हणजे सर्पदंश रुग्णाला तर ते देवदुतासारखेच वाटतातच पण ते सर्वांसाठी एक मार्गदर्शक गुरु प्रमाणे वाटतात. त्यांचा शब्द प्रमाण समजून लोकं त्यांच्या हाकेला ओ देत असतात. त्यांच्या विचारांचा प्रभाव मुखेडवासीयावर आहे. त्यांच्या कार्याविषयी घेतलेला हा आढावा .
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब सारख्या एका खेडेगावात डॉ. दिलीप पुंडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष शिक्षक होते. डॉ. पुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जांब येथेच झाले. पुढे ते शासकीय विद्यालय औरंगाबाद व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस ही पदवी घेतली. १९८८ ते १९९७ पर्यंत ग्रामीण भागातच वैद्यकिय सेवा केली. व स्वेच्छानिवृती घेवून शहरीभागापेक्षा मुखेड सारख्या ग्रामीण भागातच रुग्ण सेवा करण्याचे ठरून त्यांनी स्वतःचे पुंडे हॉस्पिटल सुरु केले. डॉ. दिलीपराव पांडूरंगराव पुंडे यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून स्वतंत्र सर्पदंश चिकित्सा आणि संशोधन केंद्र सुरु केले. त्यांच्या दवाखान्यातील एका स्वतंत्र खोलीत विविध प्रकारचे विषारी साप ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या जातीच्या विषारी सापांचे प्रकार प्रयोगशाळेत जसेच्या तसे ठेवलेले आहेत. सर्पदंश झालेल्या रुग्णानी सांगितलेल्या वर्णनावरून किंवा काहीजण साप सोबत घेवून येतात त्यावरून ते योग्य निदान व उपचार करतात. यामुळे सर्पदंश रुग्णांबरोबर आलेल्या इतर नातेवाईकांनाही योग्य असे मार्गदर्शन ते करतात. लोकांनी मांत्रिकाकडे न जाता लवकरात लवकर दवाखान्यात आल्यास वेळेवर उपचार होवून रुग्ण वाचू शकतो . त्यासाठी लोकांनी अंधश्रद्धा बाळगू नये त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे ते नेहमी सांगत असतात. आजपर्यंत जवळपास सात हजाराच्यावर सर्पदंश रुग्णांचे प्राण वाचविण्यात डॉ. दिलीप पुंडे यांना यश आले आहे. याशिवाय शंभरच्यावर डॉक्टरांना त्यांनी प्रशिक्षण देवून सर्पदंश चिकित्सा करण्यास तरबेज बनवले आहे. एवढेच नसून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्पदंशाची चिकित्सेवर शोधनिबंध सादर केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पी एच . सी . मॅन्युअल या ग्रंथातील सर्पदंश या विषयावर त्यांनी लेखन केले आहे. एपीआय , आय.एस. टी. , टी.एस आय. , आय.एस.सी. सी. एम . , आय.एम.ए. यासारख्या नामांकित संघटनांचे ते सदस्य आहेत. सध्या ते राष्ट्रीय सर्पदंश व्यवस्थापन सल्लागार समितीवर कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय विष संघटनेचे अध्यक्ष डॉ. गोपाल कृष्ण कोण व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. डेव्हिड वॉरेल यांनी डॉ. पुंडे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना सप्टेंबर २०१५ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात भरलेल्या जागतिक विष परिषदेत व्याख्यान देण्याचा मान दिला होता. नेपाळ सरकारचे काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्पदंश परिषदेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून निमंत्रीत केले व चर्चासत्र झाले होते. त्यावेळी नेपाळचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची उपस्थिती होती. या कार्याबदल त्यांना अनेक विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुखेडभूषण , मराठवाडाभूषण , महात्माफुले सामाजिक सन्मान ‘ विधान परिषद अध्यक्षांच्या हस्ते कांतीज्योती विद्यारत्न पुरस्कार ,
रेड अँन्ड व्हाईट शौर्य पुरस्कार , शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रमिलाताई भालेराव पुरस्कार , डॉ. शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कार , आय.एम. ए. परिषदेत जीवनगौर पुरस्कार व नुकताच डॉ. रखमाई राऊत सेवा पुरस्कार असे नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय मुखेड मध्ये सामाजिक संस्था व संघटन चळवळीच्या माध्यमातून समाजाची बौधिक भूक भागविण्यासाठी विविध कार्यकमाचे आयोजन करून प्रसिद्ध वक्त्यांचे मार्गदर्शन व प्रबोधनात्मक उपक्रम राबवितात . येथील अनेक संघटनांना ते योग्य असे मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत असतात. जशी आमची मायबोली मराठी परिषद , सुप्रभात मित्रमंडळ , मानव विचार मंच , जिप्सीग्रुप , अशा अनेक सामाजिक संघटनाचा जन्म डॉ. पुडे यांच्या वैचारिक मार्गदर्शनातून झाला आहे.आपल्या आईवडीलाच्या स्मरणार्थ भीमाबाई पांडुरंगराव पुंडे व्याख्यानमाला ते गेल्या १२ वर्षापासून चालवतात. याच रुग्णसेवा व सामाजिक कार्याचा वसा व वारसा आपल्या पुढील दुसऱ्या पिढींनी योग्य व यशस्वीपणे चालवावा अशी त्यांची मनिषा आहे.डॉ. दिलीप पुंडे म्हणतात की, मी जशी ३५ वर्ष रुग्णसेवा केली तशी यापुढे माझ्या कार्याचा वसा आणि वारसा आता डॉ. गौरव पुंडे आणि डॉ. तेजस्विनी पुंडे हे चालवतील. कारण डॉ. गौरव पुंडे हे सुद्धा विद्याविभुषित एम.डी. कार्डीयालाजीस्ट आहेत. भगवती हॉस्पिटल नांदेड येथे ते यशस्वीपणे रुग्णसेवेत कार्यरत आहेत. प्रथमतः आईवडील हेच आपले पहिले गुरु असतात म्हणून ‘ गुरुने दिला ज्ञानरूपी वसा , आम्ही चालवू हा पुढे वारसा … असे म्हणून डॉ. गौरव पुंडे यांनी यापुढील रुग्णसेवेची व सामाजिक कार्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याचे अभिवचन या कार्यक्रमात त्यांनी दिले. या कार्यकमात उपस्थित मान्यवर व मुखेडवासीय नागरिकांनी या नव डॉक्टर दाम्पत्यांस भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार असे सुत्रसंचलन शिवाजी आंबुलगेकर यांनी केले.
सात हजारावर सर्पदंश रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या अशा कर्तृत्ववान डॉ. दिलीप पुंडे यांच्यासारख्या देवदूतास व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वास तसेच त्यांच्या रुग्णसेवावृतीस माझा शतशः सलाम !! डॉ. गौरव पुंडे व डॉ. तेजस्विनी पुंडे या नवदाम्पत्यांस भावी यशस्वी वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा !
✍️ ज्ञानोबा जोगदंड
राजादापकेकर मुखेड
.