
दैनिक चालु वार्ता सांगोला प्रतिनिधी:- मराठी साहित्य जसे फुलत गेले पाहिजे तशी मराठी भाषा सुध्दा टिकली पाहिजे. मराठी भाषा टिकली पाहिजे. विशेषत: मुंबई महाराष्ट्रामध्ये रहावी त्यासाठी जो मराठी माणसाने लढा दिला त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मराठी टिकली पाहिजे असे माझे ठाम मत आहे. एकही मराठी कार्यालय मुंबईच्या बाहेर जाणार नाही मुंबईमध्ये भव्य असे मराठी भवन व साहित्य भवन बांधणार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे याचे काम अंतिम टप्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.दिपक केसरकर यांनी दिली.
सांगोला येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा सांगता समारोप काल सोमवार दि.10 एप्रिल रोजी ग.दि.माडगुळकर साहित्य नगरी, सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आली. सांगता समारोपप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.दिपक केसरकर बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आ.शहाजीबापू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, शिवाजीराव काळुंगे, भाऊसाहेब रुपनर, रफिकभाई नदाफ, प्रा प्रबुद्धचंद्र झपके, नियोजन समितीचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, प्रशुद्धचंद्र झपके, युवा नेते सागर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार, तालुका अध्यक्ष दादासाहेब लवटे , सोमेश यावलकर, दादासाहेब रोंगे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.दिपक केसरकर म्हणाले, खंडीत झालेली ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची परंपरा आ.शहाजीबापू पाटील यांनी सुरु केली आहे. साहित्यीकांनी कोणाकडे अपेक्षा करुन नये. पुढील वर्षीपासून अनुदानाची रक्कम वाढविण्याचा माझा विचार आहे. मराठी भाषा मागे पडत आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धनासाठी पुढे येतील त्यांना सुध्दा अनुदान देण्याची तरतूद यावर्षीपासून बजेट मध्ये ठेवली आहे. मराठी भाषा, मराठी साहित्य याला वेगळे करता येणार नाही. मराठी क्रांती, मराठी चित्रपट सृष्टी, मराठी गीते हा जरी साहित्याचा भाग असला तरी साहित्य आणि मराठी भाषा हे अविभाज्य नाते आहे.इंग्रजाच्या गुलामगिरीतून बाहेर पडले. यासाठी यावर्षीपासून इंजिनिअरिंग शिक्षण मराठीतून व पुढच्यावर्षी पासून मेडिकलचे शिक्षण मराठीमधून देण्यात येणार आहे. सगळे टेक्नीकलचे विषय मराठीमधून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वागताध्यक्ष आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, माणदेशातील माणसे ताट मानाने जगणारी असल्यामुळे या परिसराला माणदेश नाव पडले आहे असे सांगत सर्वाधीक शक्ती भाषेमध्ये असून आवाजात बदल झाली तरी भाषेत बदल होतो ही भाषेची ताकद आहे. मराठी भाषा आपल्या आई समान असून भाषा ही वाघिनीचे दूध आहे. यापुढील काळात मराठी भाषा मजबूत झाली पाहिजे. भाषेची आवड प्रत्येक तरुणांना झाली पाहिजे त्याचप्रमाणे विचाराचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी संमेलन सुरु केले आहे. सांगोल्यात एक यशस्वी साहित्य संमेलन पार पडले असून यापुढील हे संमेलन 3 ते 4 वर्षात समुद्रासारखे पसरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष श्री.इंद्रजित भालेराव म्हणाले, सांगोल्यातील साहित्य संमेलनात एकापेक्षा एक सुंदर कार्यक्रम संपन्न झाले.साहित्यीक व लेखकांनी साहित्य संमेलनात अतिशय महत्वाचा दस्तऐवज तयार केला आहे. त्यांचे भाषणाचे लेखन करा व त्यांचा सुंदर ग्रंथ तयार करा. सांगोल्यातील साहित्याची चळवळ यापुढील काळात अशीच मोठी होत राहणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या मुलांनी आत्महत्या करु नये ही बहारदार कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास ना.दिपक केसरकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉ.द.ता.भोसले, योगिराज वाघमारे, भास्कर चंदनशिव, डॉ.कृष्णा इंगोले या गौरवमुर्तीना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रा.प्रबुध्दचंद्र झपके सर, गौरवमुर्ती योगीराज वाघमारे, दादासाहेब रोंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमाशंकर पैलवान यांनी तर आभार प्रदर्शन अॅड.उदय घोंगडे यांनी मानले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीचे कार्य कौतुकास्पद:
मंत्री ना.दिपक केसरकर यांचे कडून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचे कौतुक
यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना.दिपक केसरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे कौतुक केले. श्री.स्वामी यांनी चांगले उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविलेले आहे. आदर्श शिक्षण कसे असावे यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले.अशा पध्दतीचे प्रयोग संपुर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी ना.ना.दिपक केसरकर यांनी व्यक्त केली.
आम. शहाजी बापूमध्ये उत्कृष्ठ साहित्यिक दडलेला आहे: नाम दिपक केसरकर
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी आम्हा सर्वांना आसाम मध्ये असताना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यामध्ये उत्कृष्ठ साहित्यिक दडलेला आहे. तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र धडपड करणारा उत्कृष्ठ माणूस असल्याची भावना नाम दिपक केसरकर यांनी बापूसाठी व्यक्त करुन बापूंचे कौतुक केले.