दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील मस्सा खं गावातील भगवान विधाते, व मंगल तांदळे यांच्या घराची अज्ञात चोरट्यानी घरफोडी केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. यात चोरट्याने एक एक तोळ्याच्या दोन अंगट्या एक तोळ्याची सोन्याची चैन, गंठण तसेच चांदीचे व इतर वस्तू मिळून असा अंदाजे लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
मस्सा ख गावातील भगवान सोपान विधाते हे शाळेच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या शेतातील घरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. मोठा मुलगा समाधान खाजगी नोकरीमुळे परगावी असतो. तर त्यांच्या लहान मुलाचे गावातच बेकरीचे दुकान आहे. घरात सर्वजण झोपलेले असताना चोरट्याने मध्यरात्री पाठीमागचा दरवाज्याची कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला व घरातील कपाटाची झाडा झडती घेऊन कपाटातील अडीच ते तीन तोळ्याचे दागिने लंपास केले. भगवान विधाते हे झोपेतून उठले असता घरातील सर्व सामान विस्कळीत दिसल्याने त्यांना चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ सोने असलेल्या कपटाकडे धाव घेतली तर सर्व सोने गायब झाल्याचे त्यांना दिसले.त्यांनी गोंधळून सर्वांना जागे केले व झालेला सर्व प्रकार गावात कळविला.यावेळी मंगल तांदळे याच्या घराची देखील घरफोडी चोरट्याने केल्याचे समजते.मंगल तांदळे यांच्या घराचे कुलूप तोडले व त्यांच्या घरातून गंठण अंदाजे नऊ हजार रुपये किंमतीचे अज्ञात चोरट्या नी चोरून नेहल्याची फिर्याद गणेश भगवान विधाते यांनी दिली असून अज्ञात चोरट्याविरूध्द कळंब पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश वाघमोडे करत आहेत.
एकाच रात्री तीन जणांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरले यापैकी दोन जणांच्या घरातील चोरी केली तिसऱ्या घरात जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील महिला जागी असल्याकारणाने त्या महिलेला चाकूचा धाक दाखवून काही मिळते का याचा सुगावा घेतला परंतु महिलेने आरडाओरड केल्यानंतर चोर तेथील तिच्या नवऱ्याचे कपडे घेऊन पळून गेले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.
गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत,परंतु ते बंद आहेत ते चालू करून त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरून चोरीचे प्रमाण कमी होईल.अशी पण मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.