
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकरचे विद्यमान आमदार मा.अशोकराव चव्हाण यांनी दिनांक १८ एप्रिल रोजी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीत उभे असलेले अनेक सत्ता भोगलेल्या मातब्बर उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्याचे संकेत दिल्याने अनेकांत नाराजीचा सूर पाहावयास मिळाले.या नाराजीचा जबर फटका भविष्यात काँग्रेस पक्षाला बसणार तर नाही ना? अशी उलट सुलट चर्चा मतदार वर्गातून होत असताना यावेळी दिसून आली.
भोकर बाजार समिती निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून १८ जागेसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल केले गेले होते त्यापैकी १७ अर्ज बाद झाले असून, तब्बल १७७ नामनिर्देशन अर्ज वैद्य ठरले आहेत.यात नव्याने महाराष्ट्रात दाखल झालेला बी.आर.एस. पक्ष ही निवडणुकीत उतरला असून, यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट),राष्ट्रवादी काँग्रेस, ईतर पक्षासह, अपक्ष यांनीही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत परंतु या अगोदर बाजार समिती ही काँग्रेस च्या ताब्यात होती त्यामुळे प्रामुख्याने काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्या उमेदवारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा या बाबीचा विचार करून दिनांक १८ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री, तथा विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण यांनी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक भोकरचे माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये सकाळी ११ वाजता बोलावली होती.त्यामध्ये त्यांनी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती हया सायंकाळी चार पर्यंत सुरू होत्या. यामध्ये त्यांनी अनेक मातब्बर उमेदवारांना भविष्यात येत असलेल्या अनेक निवडणुकीमध्ये आपणाला संधी दिल्या जाईल. तेव्हा यावेळी नवनिर्वाचित उमेदवारांना संधी द्यावी व आपण आपले नामनिर्देशन पत्र मागे घ्यावे आणि पक्षाला सहकार्य करावे असे सांगितले. नाईलाजाने का होईना त्यांना साहेबांसमोर होकार द्यावा लागला परंतु चेहऱ्यावरील नाराजी काही लपवता आली नाही. तेव्हा या नेत्यांच्या नाराजीचा फटका भविष्यात भोकर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला बसणार की काय ? अशी उघड उघड शंका या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक मतदारातून बोलताना व्यक्त करण्यात येत होती. तर साहेब तुम्ही आपली उमेदवारी माघार घेऊच नका असाही सल्ला अनेक समर्थकांनी आपल्या नेत्याला देताना पहावयास मिळाले.
दिनांक १८ एप्रिल रोजी केवळ आठ उमेदवारांनी आपले नाम निर्देशन पत्र वापस घेतले असून दिनांक १९ व २० एप्रिल २०२३ म्हणजे आज आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र वापस घेण्यासाठीचा अजून कालावधी शिल्लक असल्याची माहिती बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गानलेवार यांनी दिली आहे त्यामुळे दोन दिवसांत पुढील चित्र काय असेल हे स्पष्ट होईल.