दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समिती पक्षाची सभा 24 एप्रिल रोजी आमखास मैदानावर घेण्यात येणार होती. मात्र या मैदानावर सभा घेण्यास आता पोलिसांनी परवानगी नाकारलीय. त्यामुळे आता ही सभा बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर होणार आहे.
आमखास मैदान हे संवेदनशील परिसरात असल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर पक्षातर्फे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा देखील पर्याय देण्यात आला होता. मात्र तिथे पण सभा घेण्यास पोलीसांनी परवानगी नाकारल्याने अखेर शहरातील बीड बायपास रोडवरील जाबिंदा मैदानावर ही सभा घेण्याचे आयोजकांनी ठरविले आहे. या सभेवेळी शहरातील अनेक माजी नगरसेवकांचा आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश होणार आहे. या सभेच्या निमित्ताने बीआरएस पक्ष आपली ओळख आता जिल्ह्यात निर्माण करणार असल्याचे चित्र दिसतय.
या नवीन सभास्थळाची पाहणी आज पक्ष नेत्यांनी, जहिराबादचे खासदार बी.बी पाटील आणि आमदार जीवन रेड्डी यांनी केली. यावेळी पोलीस उपायुक्त दिपक गिर्हे, पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांची उपस्थिती होती.