
दैनिक चालु वार्ता
विशाल खुणे
पुणे शहर प्रतिनिधी ,
पुणे – पानशेत धरण प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेले पाहिले व पायातील गाव वांजळवाडी यांचा जमीन सातबारा नोंदीचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी ग्राम बचाव कृती समिती मौजे वांजळवाडी यांच्या शिष्टमंडळास दिला.
ग्राम बचाव कृती समिती मौजे वांजळवाडी च्या वतीने आपल्या 61 वर्षे जुन्या असलेल्या प्रलंबित प्रश्नांकरिता खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या सिंचन भवन येथील कार्यालय आवारात ‘बेमुदत वास्तव्य आंदोलन’ चे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनामध्ये दोनशेहून अधिक प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी आपल्या लहान मुले,महिला, वयोवृध्द यांसह पशुधन गाई म्हशी घेऊन उपस्थिती नोंदवली.शासनाने दिलेल्या रीतसर जमिनी व भूखंड आपल्या नावे सातबारा नोंदीस व्हावेत या प्रमूख मागणीसाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले .आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांची कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि सातबारा नोंदीचा प्रश्न काही तांत्रिक बाबीमुळे प्रलंबित राहिला असल्याचे सांगून तो लवकरच सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांच्याशी ग्राम बचाव कृती समितीचे शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह चर्चा केली.यावेळी विजय देशमुख यांनी सदरचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने काही तांत्रिक बाबी व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सुटणारा आहे असे नमूद करून आश्वासन दिले की हा प्रश्न आमच्या कामाच्या यादीत अग्रस्थानी असून लवकरच त्याचा निपटारा करण्यात येईल.याकरिता लवकरच संबधित अधिकारी व विभागांची बैठक घेण्यात येईल आणि त्यानंतर दर पंधरा दिवसांनी कार्य आढावा बैठक घेण्यात येईल. तसेच नांदोशी येथे पुनर्वसन गावठाणात झालेले मूळ मालकांचे अतिक्रमण त्वरित हटवले जाईल व प्रकल्पग्रस्तांना यापुढे त्रास होणार नाही यासाठी कार्यवाही करण्यात येईल .याकरिताचे आदेश हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना लगेचच दुरध्वनीवरून संपर्क साधून देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळामध्ये समितीचे निमंत्रक महेश गायकवाड यांच्यासह गजानन बिरामणे, माजी सरपंच सौ रंजनाताई वाळंजकर, शिवाजी पिसाळ, रमेश जागडे, ज्ञानेश्वर ठाकर, नितीन घाडगे, हिराबाई वाळंजकर, अलकाताई घाडगे, उल्हास जागडे,अमोल ठाकर, हनुमंत बिरामणे,अभिजित ठाकर, शैलेश जागडे आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
आम्हां छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांवर हा मोठा अन्याय झाला असून न्यायहक्कांसाठी आम्हला 61 वर्षे झगडावे लागते ही नामुष्कीची बाब असून यापुढेही याप्रकरणी शासनाने चालढकल केली किंवा हलगर्जीपणा केल्यास आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी पानशेत धरणाचे पाणी अडविणार असून तेथे होत असलेली वीजनिर्मिती बंद पाडू असा इशारा कृती समितीचे निमंत्रक महेश गायकवाड यांनी यावेळी दिला.
अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनकर्त्याना कालबद्ध सूचित करून सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले, त्याची प्रत पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनाही देण्यात आली असून त्यांच्या या अश्वसित विनंतीनुसार रात्री आठ वाजता समितीने सदरचे बेमुदत वास्तव्य आंदोलन स्थगित केले आणि सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबीय आपल्या पशुधनासह घरी परतले.