
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, “देशातील नागरिकांना आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता अधिक गंभीर होऊन जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध करुन द्यावी. देशातील कोरोना लसीकरणाची स्थिती वाईट असून ती एका व्यक्तीच्या फोटोमागे दीर्घ काळापर्यंत लपवता येणार नाही.”
केवळ एका व्यक्तीच्या फोटोमागे देशातील कोरोना लसीकरणाचे अपयश दीर्घ काळ लपवता येत नसल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधीं नी पंतप्रधान मोदींवर केली आहे.कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून देशवासियांना मोठा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
गेल्या आठवड्यात दर दिवशी 68 लाख लोकांचं लसीकरण झालं असून हे खूप संथ गतीनं होतंय असं राहुल गांधींनी सांगितलंय. रोज 2.30 कोटी लोकांचं लसीकरण होण अत्यावश्यक असल्याचंही ते म्हणाले.
जगभरात ओम्रिकॉनचा धोका वाढला
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट ओम्रिकॉन ( B.1.1529) अतिशय ‘चिंतेचा’ ( concern) असल्याचे घोषित केले आहे. भारतात सध्या या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. पण मागच्या लाटेत आपल्याला जोरदार तडाखा बसला होता. हा नवा विषाणू डेल्टापेक्षाही भयानक मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी यावेळी उशीर होऊ नये यासाठी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
नवीन कोरोना व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक प्रमाणात म्युटेट होतोय. जगभरातील तज्ज्ञ या प्रकाराला मोठा धोका मानत आहेत. तज्ज्ञांच्या मते,ओम्रिकॉन व्हेरिएंटमध्ये इतर व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त वेगाने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.