
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मोटार अपघातातील मयताच्या वारसांना रुपये ७०.४० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश परभणी मोटार अपघात न्याय प्राधिकरणाचे न्यायाधीश एम.व्ही. मोराळे यांनी दिले आहेत.
परभणी येथील रहिवाशी असलेले व मनमाड येथील भारत पेट्रोलियम कंपनी लि.येथे कार्यरत कर्मचारी आशिष भालचंद्र शुक्ला हे नेहमीप्रमाणे १२ ऑगस्ट २०१५ रोजी दुचाकीवरून आपल्या कंपनीकडे जात होते. त्याच दरम्यान भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून एम्.एच्.१५ सी.के.९४०० क्रमांकाचा टॅंकर, चालकाने आशिष शुक्ला यांच्या दुचाकी वाहनास पाठीमागून जबरी धडक दिली व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गणेश केदारे यांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. मनमाड न्यायालयात त्याच्या विरोधात प्रकरण चालू होते. मयत आशिष शुक्ला याचे वारस आई-वडील यांनी परभणी येथील मोटार अपघात न्याय प्राधिकरणात नुकसान भरपाई मिळण्यासाठी टँकर मालक, चालक आणि बजाज अलायन्स कंपनी आदींच्या विरोधात प्रकरण दाखल केले. या प्रकरणी कंपनीचे जनरल मॅनेजर तसेच टँकरचा चालक यांची साक्ष नोंद करण्यात आली. टँकर चालकाच्या चुकीने अपघात झाला असल्याचे ग्राह्य धरून व दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून टँकर मालक साहेबराव महाले व बजाज अलायन्स कंपनी यांनी संयुक्तरित्या मयताच्या वारसास रुपये ७०.४० लाख आणि त्यावर ६ टक्के व्याज याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश मोटार अपघात प्राधिकरणाचे न्यायाधीश एम्.व्ही. मोराळे यांनी दिले आहेत. या प्रकरणी अर्जदाराच्या वतीने अॅड. सतीश प्र.औंढेकर यांनी अॅड.अनिल औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजू मांडली. एकूणच या निर्णयामुळे मयताचे पालक आणि आप्तेष्ठांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.