
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/केज–केज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत १८ पैकी १४ जागेवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, (दि. १२) मे रोजी सभापती, उपसभापतीची निवडी होणार आहे. धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन सन १९९८ साली केजला स्वतंत्र बाजार समितीची स्थापना झाली होती. या बाजार समितीवर सुरुवाती पासून माजी आमदार स्व. बाबुराव आडसकर यांनी वर्चस्व गाजवले. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आणि भाजपचे रमेशराव आडसकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. यावेळी पहिल्यांदा १८ जागेपैकी १५ जागेसाठी निवडणुक झाली. या निवडणुकीत आडसकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने सहकारी संस्थेच्या मतदार संघाच्या सर्व ११ जागा जिंकून आणि व्यापारी व हमाल मतदार संघाच्या पूर्ण ३ जागा बिनविरोध आणून आपले वर्चस्व कायम ठेवले होते. बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवड उद्या १२ मे रोजी होणार असून सभापती, उपसभापती पदाचीनिवडणूक ही बिनविरोध होईल अशी अपेक्षा आहे. आडसकर हे ठरवतील तोच सभापती होणार असून सभापती पदासाठी अंकुशराव इंगळे यांचे नाव चर्चेत आहे. तर उपसभापती पदासाठी मुंदडा गटाचे नेताजी शिंदे, डॉ. वासुदेव नेहरकर, वसंत केदार यांच्याकडून रस्सीखेच होऊ होण्याची शक्यता आहे. मात्र ऐनवेळी रमेशराव आडसकर हे काय निर्णय घेतात? सभापती, उपसभापती पदावर कोणाची वर्णी लागते. ते उद्या स्पष्ट होणार आहे..