
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशीम- वसंत खडसे
वाशिम : प्रस्थापितांनी व धर्माने स्त्री वर्गाला धार्मिक भावनेत व कुटुंबात चूल आणि मूल या परंपरागत चालत आलेल्या रुढीत नेहमीच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. या परंपरेला आव्हान देण्यासाठी जिजाऊ~ सावित्रीच्या प्रेरणादायी विचारातून सामाजिक बदलांचा वेग वाढविण्याचे काम जिजाऊ ब्रिगेड या संघटनेने हाती घेतले आहे. जिजाऊंना आदर्श व प्रेरणास्थानी मानणाऱ्या जिजाऊ ब्रिगेड ही संघटना स्त्री चळवळीला वेग देणारी संघटना म्हणून नावारूपास आली आहे. आजमितीस, महिलांनी राजकारण, प्रशासन, संशोधन आदि प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना, त्यांच्या ” एक पाऊल पुढे ” अशी उत्तुंग भरारी घेतली आहे. स्वकर्तृत्व सिद्ध करून अनेक महिला राजकारण, प्रशासन आदी प्रत्येक क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत. अशा महिलांचा सत्कार आवर्जून जिजाऊ ब्रिगेडकडून केला जातो. त्या अनुषंगाने जिजाऊ ब्रिगेड शाखा शेलुखडसे यांच्या वतीने रिसोड तहसीलच्या पहिल्या महिला तहसीलदार म्हणून बहुमान मिळविणाऱ्या प्रतीक्षा तेजनकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड शाखा शेलुखडसेच्या अध्यक्ष सौ. बालूताई संजय खडसे यांनी जिजाऊ माँसाहेबांची प्रतिमा भेट देऊन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचा सत्कार केला. प्रसंगी सौ. बेबीताई विलास खडसे, सौ संगीताताई विजय खडसे, सौ विमलताई ज्ञानेश्वर खडसे व रोहिणी पंजाब खडसे आदि जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संभाजी ब्रिगेडचे रिसोड मालेगाव विधानसभा अध्यक्ष अर्जुन पाटील खरात यांच्या मार्गदर्शनात झालेल्या सत्कार कार्यक्रमात तहसीलदार यांच्यासमवेत असलेले पीएसआय आघाव,आणि डॉ. तेजनकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष रामेश्वर खडसे, तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर खडसे, विजयकुमार खडसे, पंजाब खडसे, संजय खडसे, राजू खडसे, शिवाजी खडसे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती.
” स्वराज्याची खरी प्रेरणा असणाऱ्या जिजाऊ माँ साहेबांनी दोन छत्रपती घडवले. त्या वैज्ञानिक दृष्टी असलेल्या कर्तृत्ववान महिला होत्या. म्हणूनच त्यांनी स्वराज्य प्राप्तीचा खडतर मार्ग स्वीकारून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून आज अनेक महिला आपलं कर्तुत्व सिद्ध करत आहेत. अशा धाडसी, कर्तुत्ववान, स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ चरणी मी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते.
____
प्रतीक्षा तेजनकर
( तहसीलदार, रिसोड )