
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : टीम इंडियाला १७ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच, भारताचा अ संघ सीनियर संघापूर्वीच तिथे गेला आहे. जिथे त्यांना चार दिवसांत तीन सराव सामने खेळायचे आहेत. सीनियर संघात निवडलेल्या अनेक खेळाडूंना भारत अ संघात स्थान मिळाले आहे.
करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले.तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले. जगातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिका प्रवासावर बंदी घातली आहे. दक्षिण आफ्रिकेचे सरकार हाय अलर्टवर गेले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी केली जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराही धोक्यात येताना दिसत आहे.
जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. टीम इंडिया डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. मात्र या दौऱ्याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकुर म्हणाले, “करोनाच्या अशा परिस्थितीत, प्रत्येक बोर्डाने मग ते बीसीसीआय असो किंवा इतर कोणीही असो, त्यांनी भारत सरकारची परवानगी घ्यावी. त्यांच्याकडून अर्ज आल्यावर सरकार निर्णय घेईल.” करोनाच्या नवीन व्हेरिएंटनंतर दक्षिण आफ्रिकेचे सरकार हाय अलर्टवर गेले आहे. B.1.1529 म्हणून ओळखला जाणारा नवीन प्रकार आफ्रिकेहून बोत्सवाना आणि हाँगकाँगला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळला आहे. देशात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी केली जात आहे.
या दौऱ्याबाबत बीसीसीआयने देखील अपडेट दिले आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. “आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या (CSA) संपर्कात आहोत. अशा कठीण काळात, आपण फक्त आशा करू शकतो की गोष्टी नियंत्रणात असतील.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) बैठक घेत देशातील करोना विषय उपाययोजनांचा आढावा घेतला. दोन तास चाललेल्या बैठकीत ओमिक्रॉन या नव्या करोनाच्या व्हेरिएंटबाबतची सद्य स्थिती पंतप्रधानांनी माहिती करुन घेतली. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तेव्हा सध्या तरी अशी कोणतीही बंदी घातली गेली नसल्याचं बैठकीनंतर स्पष्ट झालं आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा ही गेले काही महिने विविध निर्बंधांसह सुरु होती, मात्र आता येत्या १५ डिसेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही पुर्ववत सुरु करण्याचा निर्णय हा नुकताच घेण्यात आला आहे. तेव्हा सध्याची करोनाची बदलती स्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत असलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे निर्देश पंतप्रधान यांनी यावेळी दिले.
आंतरराष्ट्रीय विमान सेवेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या. तसंच रिस्क या क्षेत्रात मोडणारे देश ओळखत त्याबाबत करोना विषयक नियमांनुसार करोना टेस्ट सारख्या आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.