
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
लोहा तालुका नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या स्थानावर आहे. लोहा व कंधार ह्या दोन्ही तालुक्यातील तीर्थक्षेत्र, श्रध्दास्थळं, घाटपरिसर, पर्यटन स्थळं, गडकोट, धरणं, प्रेक्षणीय स्थळे, विविध धार्मिक स्थळं, संत-महात्मे यांचे जन्म स्थळं आणि कर्म स्थळं आजही विकासापासून वंचित आहेत. त्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे, प्रत्यक्ष पहाण्याचा लाभ घेणे, निरिक्षण करुन त्या स्थानाचे महत्त्व अवलोकन करणे, अवगत करणे, विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणे अधिक महत्वाचे आहे परंतु तेथे जाण्यासाठी कुठे रस्ते उपलब्धच नाहीत, जेथे आहेत तेथील रस्त्यांची कमालीची दूरावस्था आहे. त्यामुळे तेथे वाहतूक व्यवस्था नियमितपणे नसते. परिणामी तेथील पूर्वापार दैवतांचा अथवा पर्यटन स्थळांचा लाभ मिळणे दूरापास्त ठरले जाते.
देशाचे दळणवळण मंत्री नितीन गडकरीजी यांना नागरी सेवेबरोबरच तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळांच्या प्रति कमालीची श्रध्दा व आपुलकी आहे. त्या त्या क्षेत्राचे महत्त्व त्यांना चांगलेच अवगत आहे. ज्येष्ठ नागरिकांना काय अभिप्रेत आहे, याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. श्रध्दास्थळांप्रति ज्येष्ठांच्या भावना ना. गडकरीजी पूरते जाणून आहेत. त्यांच्या भावनांना मुरड घालणे हे त्यांना किंचितही रुचणारे नाही. किंबहुना त्याच भावना ओळखून दळणवळण मंत्री नितीन गडकरी जी विकासापासून वंचित, उपेक्षित स्थळांचा व तेथे जाणाऱ्या अविकसीत रस्त्यांचा विकास लवकरात लवकर निश्चितच करतील यात तिळमात्र शंका नसावी. लोहा-कंधार तालुक्यातील जी संस्थानं आणि मार्ग विकासापासून वंचित, उपेक्षित आहेत, त्यांच्या विकासासाठी योग्य असे अहवाल तयार करुन त्वरित सादर करावेत अशी सूचना त्यांनी नुकताच त्या भागाचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि समाजसेविका तथा शेकापच्या प्रदेश महिला अध्यक्षा सौ.आशाताई शिंदे यांनी ना. गडकरी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी या उभयतांना सूचित केले. यातूनच ना.गडकरी यांच्या अंगी असलेला मोठेपणा आणि कोणताही भेदभाव न ठेवता नागरी सेवा करण्याची मानवता नेमकी काय असते जणू हेच त्यातून सिध्द झाले आहे.
तीर्थक्षेत्र अंतेश्वरचे गत वैभव, तेथे आवश्यक असलेला गोदावरी नदीवरील भव्य असा घाट निर्माण करणे, या क्षेत्राला महाराष्ट्र शासनाकडून मंजूर पर्यटन स्थळाचे आदेश प्राप्त करुन त्या पध्दतीचा विकास घडवून आणणे, दक्षिण भारतातील भव्य असे तीर्थक्षेत्र माळेगांव धार्मिक स्थळाचा आणि परिसराचा विकास घडवून आणणे, पशूधनाच्या खरेदी-विक्रीबरोबरच अनेक धार्मिक स्थळांचे महत्व ध्यानी घेऊन लोहा या तालुका स्थळांचा विकास साधणे, कंधार येथील ऐतिहासिक अशा गडकिल्ल्याच्या वास्तूचा विकास करणे, अन्य धर्मीय श्रध्दास्थानं, पर्यटन स्थळं सांस्कृतिक स्थळंं आदींचा विकास घडवून आणणे, बारुळ येथील भव्य अशा धरणाचा कायमस्वरूपी विकास मार्गी लावणे, मोठे पेनूर येथील धार्मिक वैभव मोठ्या प्रमाणात विकसित करुन सर्व-धर्म-समभावाला महत्व मिळवून देण्याबरोबरच सर्वधर्मीय नागरिंकांमध्ये एकता व सलोखा कायम टिकून राहिला जावा यासाठी या स्थानाचा उत्थान घडवून आणणे, बोरगाव येथील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थानं असलेले श्री इरसाप्पा स्वामी मंदीराचा व परिसराचा आणि मुस्लिम धर्मीय देवस्थानाचा विकास घडवून आणून तेथील भक्तगणांच्या भावनेतून निर्माण एकोपा, सलोखा कायमस्वरूपी जपणे, याशिवाय कळत न कळत अनावधानाने राहिलेल्या श्रध्दास्थानांचा विकास घडवून आणणे, इतकेच नाही तर त्या त्या ठिकाणी (जाणे-येणे) रहदारी साठी योग्य पध्दतीचे व मजबूत असे रस्ते कायम स्वरुपी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. या व अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन उपरोक्त धर्मस्थानं, पर्यटन स्थळं व अन्य स्थानांप्रति आत्मियता दाखवून विकास घडविला जाईल या पध्दतीचा अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना त्वरीत सादर केल्यास त्याचे पूण्य आपणास निश्चितच मिळू शकेल यात कोणतीच शंका नाही. मानव रुपी सेवा ही परमेश्वराच्या सेवेचाच एक भाग असू शकतो. मानवाच्या श्रध्देचा भाग असलेली परमेश्वराची मंदीरे, त्याला निगडीत पर्यटन स्थळं, संतांची जन्मस्थान व कर्मभूमी आदींचा विकास घडवून आणला गेला तर याचं पूण्य जन्मोजन्मी मिळाल्याशिवाय राहाणारे नाही.