दै चालु वार्ता वृत्तसेवा /
नवी दिल्ली : टोकियोतील ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया काही खेळाडूंना प्रमोशन देण्याचा निर्णय घेण्यात स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून घेण्यात आला आहे . यामध्ये हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, गोलरक्षक सविता पुनिया, पॅरालिम्पिक पदक विजेता मरीयप्पन थांगवेलू व शरद कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.तसेच हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाचे सपोर्ट स्टाफमधील पीयूष दुबे यांनाही बढती देण्यात आली आहे.
शिवाय आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारे, अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सर डिंको सिंग यांचे याच वर्षी लिव्हर कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना ६.८७ लाख रूपये अनुदानाच्या रूपात देण्यात येणार आहेत. साई च्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
तसेच
हिंदुस्थानचा महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही, पण या संघाने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारत ठसा उमटवला. या संघामध्ये राणी रामपाल व सविता पुनिया या दोन खेळाडूंचा समावेश होता. सविता पुनिया हिला सहाय्यक प्रशिक्षकाहून प्रशिक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. तसेच राणी रामपाल व पीयूष दुबे यांना सीनियर कोच म्हणून प्रमोशन देण्यात आले आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेला मरीयप्पन थांगवेलू याला सीनियर प्रशिक्षक पदावरून मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच शरद कुमार याला सहाय्यक प्रशिक्षक पदावरून प्रशिक्षक पदावर बढती देण्यात आलेली आहे.