दैनिक चालु वार्ता माहूर प्रतिनीधी –
माहूर- दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासा निमित्य माहूर ह्या पवित्र क्षेत्रावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अधिक मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हिंदू धर्मात हा महिना अत्यंत पवित्र मानला जात असून दान धर्म करण्यास अत्यंत उपयुक्त महिना आहे. हिंदू धर्मात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानल्या जाते. अन्नदानच्या उपक्रमात सदैव अग्रेसर असलेल्या आनंद दत्त धाम आश्रम उर्फ वसमतकर मठाच्या वतीने यावर्षी त्याच अनुशंगाने येणाऱ्या अधिक मासामध्ये संपूर्ण माहूर शहर दररोज सकाळ संध्याकाळ धोंड्यासह मिष्टान भोजनाच्या महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची घोषणा आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती राष्ट्रसंत द.भ. प. साईनाथ महाराज बितनाळकर यांनी केले.
दि. 16 जुलै 2023 ते दि.15 ऑगस्ट 2023पर्यत अधिक मास निमित्य सकाळी 9:30 ते दुपारी 2:30 पर्यंत धोंड्यासह मिष्टान भोजन महाप्रसाद संपूर्ण माहूर शहराकरिता आयोजित करण्यात आले आहे.
दि.१६ रोजी आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे आनंदवासी द.भ.प. दत्ता महाराज बितनाळकर यांच्या १७ व्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्याने आयोजित पुण्यानुमोदन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सीताराम ठाकरे, भाऊराव पाटील हडसनीकर, पुंडलिक हुंबे, वसमतचे मुकुंदराव करवंदे, सामाजिक कार्यकर्त्या प्रभाताई कंधारे, दिलीपराव पाटील कोपरकर, दीपक शिंदे, संतोष अडकीने, एस.एस.पाटील सुधीर जाधव, संतोष तामखाने, नथू पा.भांगे, जयकुमार अडकीने, राज ठाकूर, दत्ता शेरेकर आदीसह हजारो दत्तभक्त ,महिला पुरुष अबाल वृद्धाची उपस्थिती होती. यावेळी अनेक भक्तांनी आपल्या मनोगताव्दारे आनंदवासी दत्ता महाराज बितनाळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व वसमतकर मठाच्या विविध सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय कार्यांचे स्मरण करून उजाळा दिला. पुढे बोलतांना महाराज म्हणाले की, सदर महाप्रसाद कार्यक्रमाचा माहूर शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ह्या करिता शहरात लवकरच वार्ड निहाय बैठका घेऊन नियोजन करण्यात येणार असून समाजातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय तथा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्याची आवश्यकता असल्याने सर्वांनी आनंद दत्तधाम आश्रमास आपल्या अमुल्य वेळेचे सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.