
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई: चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महिलांवरील अत्याचाराच्या समस्यांवरून ठाकरे सरकारला घेरले. आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केलेली असतानाच चित्रा वाघ यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी आघाडी सरकारकडून पोलीस आणि कायदेशीर यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. कुर्ला येथे एका तरुणीचा बलात्कार करून खून करण्याची घटना राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या अपयशामुळेच घडली. आघाडी सरकारने महिलांना सुरक्षा देण्याच्या घोषणा करणे थांबवून पोलीस यंत्रणेत व कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी वाघ यांनी केली. राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसे न दिवस वाढत आहेत. बलात्कार आणि खूनाच्या घटना या निव्वळ सरकारच्या यंत्रणांना अपयश आल्यामुळेच होत आहेत.या सर्व घटनांना राज्य सरकारच जबाबदार असून महिलांवरील अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
आघाडी सरकारने शक्ती कायदा आणण्याच्या सातत्याने घोषणा केली. पण हा कायदा अजूनही अस्तित्वात आला नाही. सरकारची ही घोषणा हवेतच विरल्यासारखी परिस्थिती आहे. शक्ती कायदा यायचा तेव्हा येईल. पण आहे त्या कायद्यांची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी केल्यास तसेच विद्यमान कायद्यात आवश्यक ते बदल केल्यास गुन्हेगारांना नक्कीच वचक बसेल. आजपर्यंत कधीही कायदा आणि सुव्यवस्थेची इतकी वाईट पद्धतीची लक्तरे निघाली नव्हती, ती या दोन वर्षामध्ये निघाली. एखाद्या घटनेवरती लोकांकडून आवाज उठवला गेला की हा खटला आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवू किंवा एखादा नवीन कायदा बनवू, अशा घोषणा केल्या जातात. मात्र या घोषणांना मूर्त रूप मिळत नाही. याचा अनुभव शक्ती कायद्याच्या रूपातून राज्यातील महिला घेत आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.