
दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचे कर्ज काढून सीताराम महाराज साखर कारखाना उभारला पण शेतकऱ्यांना सभासदत्व मिळाले नाही की पैसे परत मिळाले नाहीत, हे पैसे शेतकऱ्यांना परत करा, आम्ही तुमचा शिवाजी चौकात जाहीर सत्कार करू असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना आणि खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखाना यांच्यासंदर्भात ऍड. दीपक पवार यांनी चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर सतत आरोप करण्याचा धडाका लावला आहे. पवार यांनी कल्याणराव काळे यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी कडे यापूर्वीच अत्यंत गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे, शिवाय स्थानिक पातळीवर सतत आरोप केले जात असल्याने कल्याणराव काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भागधारक शेतकऱ्यांच्या बैठकीत आज दीपक पवार यांनी काळे याना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.
यापूर्वी दीपक पवार यांनी काळे यांच्यावर विविध आरोप केल्यानंतर काळे यांनी खुलासा केला होता आणि शेतकऱ्यांचे पैसे आपण परत करणार असल्याचे सांगितले होते त्यावर दीपक पवार यांनी आज या बैठकीत थेट काळे याना आव्हान दिले आहे. गुढीपाडव्यापर्यंत शेतकऱ्यांचे पैसे परत द्या, आम्ही तुमचा छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सत्कार करू असे आव्हानच पवार यांनी दिले आहे. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीताराम महाराज साखर कारखाना उभारण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपये घेतले पण शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळाला नाही, शेअर्स म्हणून घेतलेले पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुढीपाडव्यापर्यंत जमा करावेत, आपण स्वखर्चाने काळे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी चौकात करू असे आव्हानच आज पवार यांनी दिले आहे.
भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर असून हे कर्ज कल्याणराव काळे यांच्याच कार्यकाळात झाले आहे, या कर्जाचा कोणत्या कारणासाठी वापर करण्यात आला हे कल्याणराव काळे यांनी शेतकऱ्यांना सांगावे, सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी शेतकऱ्याच्या सात बारा उताऱ्यावर बँकेचे कर्ज काढण्यात आले पण शेतकऱ्यांना काय मिळाले ? बारा वर्षात शेतकऱ्यांना सभासदत्व मिळाले नाही की त्यांचे पैसेही मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या पैशातून उभा केलेल्या सीताराम महाराज साखर कारखान्याची विक्री करण्यात आली, विक्री केल्यानंतर तरी शेतकऱ्यांचे पैसे परत मिळणे अपेक्षित होते पण तसे घडले नाही, उलट हे पैसे मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. व्याजासह हे पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत यासाठी आपला संघर्ष असून पैसे परत मिळेपर्यंत तो सुरूच राहणार आहे असेही यावेळी दीपक पवार यांनी सांगितले. गुढीपाडव्यापर्यंत त्यांनी ते पैसे परत केल्यास आपण काळे यांचा जाहीर सत्कार करू असे आव्हानच त्यांनी दिले असून काळे हे आव्हान स्वीकारतात काय ? याकडे आता सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पवार यांनी ईडीकडे कल्याणराव काळे यांच्या विरोधात तक्रार केली असून सीबी कडेही तक्रार करण्यात आली आहे. सदर प्रकरणी दोन चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कंपनी कायद्यानुसार लवकरच कार्यवाही सुरु होईल असेही यावेळी दीपक पवार यांनी सांगितले. पवार यांच्या या आव्हानांवर काळे यांची काय प्रतिक्रिया असेल याची आता तालुक्याला प्रतीक्षा लागलेली आहे.