
दैनिक चालू वर्ता
प्रतिनिधी (विश्वास खांडेकर )
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात घाटीवळे नावाचे एक छोटेसे गाव आहे, गावाला निसर्गाची अप्रतिम सुंदरता लाभलेली आहे. नावाप्रमाणे या गावामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला घाटी उतरून जावे लागते. या गावाला तसे जोडणारी साधने फार कमी आहेत, गावात एक छोटासा रस्ता आहे त्याची अवस्था फारशी नीट नाही परंतु जेव्हा तुम्ही गावाच्या वेशीजवळ जाल त्यावेळी तुम्हाला हे गाव अतिशय नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण झालेले दिसेल. गावाची अवस्था म्हणजे चारी बाजूंनी डोंगर ज्याला की इंग्लिश मध्ये ‘व्हॅली’ असे म्हणतात आणि त्या दरीच्या पोटाशी अडीच हजार लोकवस्तीचे एक सुंदर गाव वसलेले आपल्याला दिसून येईल. या गावांमध्ये ब्राह्मणवाडी मध्ये तुम्हाला विठ्ठलाचे एक सुंदर मंदिर दिसून येईल या मंदिराची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे . परंतु या मंदिराचे उत्सव 1928 सालापासून सुरू करण्यात आला.
यामध्ये प्रामुख्य घेतले ते खांडेकर परिवाराने ,सुरुवातीला हे मंदिर खांडेकर परिवाराच्या शेतामध्ये उभे आहे . चार पिढ्या पूर्वी येथील खांडेकर परिवारातील लोकांनी प्रमुख पुढाकार घेऊन या मंदिराची स्थापना केली. यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची एक अप्रतिम अशी मूर्ती बनवून घेतली, त्यानंतर शिंदेवाडी, ब्राह्मणवाडी, हेगिष्टे वाडी आणि सुतारवाडी अशा चार जणांनी मिळून या उत्सवाला सुरुवात केली.
वंशपरंपरे प्रमाणे दरवर्षी तीन दिवसाचा उत्सव येथे साजरा केला जातो दशमी, एकादशी ,द्वादशी असा या उत्सवाचा कालावधी असतो. दशमीच्या दिवशी सकाळी अभिषेकाने सुरू झालेला हा उत्सव दुपारी येथे कीर्तन केले जाते, संध्याकाळच्या वेळी स्थानिक भजनी मंडळ येथे आपले भजनाची सेवा बजावतात .तर नऊ ते दहा पर्यंत आरत्यांचा कार्यक्रम होतो आणि मग देवाचा छबिना मंदिराच्या भोवती फिरवला जातो जवळ जवळ पहिला दिवस रात्री दोन-तीन वाजता संपतो.
मग येते दुसऱ्या दिवसाची सुरवात, दुसऱ्या दिवशी सकाळीच देवांचा अभिषेक पूजा केली जाते, आणि देवाची पालखी गावामध्ये फिरवण्यास नेली जाते.यावेळी गावातील सर्व जाती पंथाचे लोक पालखी मध्ये भाग घेतात. पालखीच्या मागे भजन कीर्तन केले जाते. दिंडी फिरवली जाते सुरुवातीला खांडेकर परिवारातील मोठ्या घराला मान दिला जातो ,त्यानंतर ती वरच्या शिंदेवाडी जाते तिथून ते खालचा शिंदेवाडी मध्ये येते त्यानंतर ती विश्वास खांडेकर यांच्या घरी मानाचे स्थान म्हणून जाते ,व पुढे हेगीष्टे वाडी मध्ये जाते आणि सगळ्यात शेवटी सुतारवाडीतून जाऊन ही पालखी मंदिरामध्ये येते. मग संध्याकाळी परत कीर्तन केले जाते आरत्या आणि मग संध्याकाळी परत पालखीचा भवत्यांचा कार्यक्रम चालू होतो.
मग येतो तिसरा दिवस सुरुवातीला तिसऱ्या दिवशी सकाळीच देवांचा परत अभिषेक केला जातो आणि दुपारी असतो तो जेवणाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम हा महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत चालतो जवळजवळ पाचशे ते हजार लोक या ठिकाणी महाप्रसादासाठी येतात . महाप्रसाद संपल्यानंतर परत कीर्तनाचा कार्यक्रम होत नाही, संध्याकाळच्या आरत्या मग भोवत्या आणि मग लळिताचे कीर्तन केले जाते आणि उत्सवाची सांगता होते .
गावाचे अशी परंपरा आहे की हा उत्सव दर वर्षी एकाने करावा, काही लोक नवस बोलतात आणि नवस पूर्ण करण्यासाठी हा उत्सवाचा खर्च स्वतः करतात. त्याचप्रमाणे येथील सुभाष खांडेकर यांनी पाच वर्ष उत्सव करण्याचे मनोगत केले आहे. त्यातील हे दुसरे वर्ष आहे, त्यांनी संपूर्ण स्वतःचा खर्च करून तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या उत्सवाचे वातावरण आधी मनोहर सुंदर भक्तिमय असे आहे .निसर्गाच्या मध्यभागी दिवस-रात्र देवाची सेवा करणारे भक्तीने ओत प्रोत लोक तुम्हाला पहावयास मिळतील . दिवसेंन दिवस लोक खेड्याकडे पाठ फिरवून शहराकडे जात आहेत ,परंतु ह्या गावाचा आदर्श असा सांगावा लागेल की उत्सवाच्या वेळी माहेरवाशिणी असो किंवा गावातील कुठलाही व्यक्ती असो तो या उत्सवाच्या काळात गावात एक दिवसासाठी तरी हजेरी लावून जातो. त्यामुळे गावाला अतिशय प्रसन्नतेचे वातावरण असते, गाव आनंदाने भरून जाते, लोक एकमेकांच्या भेटीगाठी घेतात आपल्या भावना व्यक्त करतात जणू काही नवीन भाषेत’ गेट-टुगेदर’ असे वाटते . परंतु हा गेट-टुगेदर म्हणजे भगवंतचा आशीर्वाद होय हे विसरायला नको. यामुळे भारतीय संस्कृतीची विसरत चाललेली परंपरा ,त्या भारतीय संस्कृतीचा विकास प्रचार आणि प्रसार या गावातून आपल्याला पहावयास मिळतो ही परंपरा एक दोन तीन चार वर्षाची नसून गेली 93 वर्षाची आहे, ही परंपरा सातत्याने चालू आहे आणि ह्या परंपरेत आता शंभरावा उत्सव जवळ आला आहे .लोकांमध्ये चर्चा आहे की 100वा उत्सव अगदी आनंदाने साजरा करावा आणि पूर्ण महाराष्ट्राने हा उत्सव बघावा यासाठी आमचे’ दैनिक चालू वार्ता’ देखील या उत्सवा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांपर्यंत पोहोचणे लोकांचा आनंद भावना मनातील इच्छा आकांक्षा त्यांच्या अडी अडचणी या पूर्ण महाराष्ट्र पर्यंत पोहोचवणे हेच दैनिक चालू वार्ताचे कार्य आहे आणि हे आपल्याला या खेडोपाड्यातील कव्हरेज वरून नक्कीच दिसून येईल. तरी सांगतो लोकांनो की परत खेड्याकडे चला खेडी समृद्ध करा भारतीय संस्कृतीला जपा तिचे संवर्धन करा ही एवढी भावना.