
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
कोलकत्ता : ममता बॅनर्जी या दुसऱ्या राज्यात पक्ष विस्तार करण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर काम देखील सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये दुसऱ्या राज्यातील नेत्यांना देखील संधी मिळावी, यासाठी वर्कींग कमिटीचे सदस्य देखील बदलण्यात येणार आहेत. आतापर्यंत तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालशिवाय त्रिपुरा, मेघालय आणि गोवा या तीन राज्यात आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी आता पक्षाचे नाव बदलण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी नव्या नावासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबत ‘न्यूज १८’ने वृत्त दिले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस पक्षाचा (TMC) राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा विचारात आहेत. त्यामुळे पक्षाचे नाव बदलण्याची चर्चा सध्या पक्षामध्ये सुरू आहे.याबाबतच अंतिम निर्णय ममता बॅनर्जी घेणार असून सध्या पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार टीएमसीला सध्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. मात्र, आतापर्यंत पक्ष पश्चिम बंगालशिवाय दुसऱ्या राज्यात विस्तार करू शकला नाही. आता देशात पक्षाचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी पक्षाचे नाव बदलण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसला केवळ बंगालचा पक्ष म्हणून नव्हे तर देशभरातील पक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर नेणे हा या बदलामागचा मुख्य उद्देश असणार आहे.