
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे : 2024 मध्ये भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल असा दावा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.अशावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्यसरकार पाडणार नाही. हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे ते आता स्वीकारत आहेत, असा टोला मलिकांनी लगावलाय. तसंच 2024 साली हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास आहे की, हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नाही तर 25 वर्षांसाठी एकत्र आले आहे, असे सांगत मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीची भावना माध्यमांपुढे मांडली.
महाविकास आघाडी सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसरकारच्या कामकाजाचा आढावा माध्यमांसमोर मांडला.
सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम मागील सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संकट आले. मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती आपण पाहिली तशी परिस्थिती राज्यसरकारने राज्यात निर्माण होऊ दिली नाही. यासाठी कोविड सेंटर्स, टेस्टींगमध्ये वाढ, ऑक्सिजनसाठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्यसरकारने वेळोवेळी केल्याचे मलिक यांनी सांगितले.