
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीन बाग आंदोलन तर चांगलंच गाजलं. आता पुन्हा एकदा एनआरसीचा मुद्दा चर्चेत आलाय. करोनाच्या आधी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) या दोन मुद्द्यांवर देशभरात आंदोलनं झाली.
लोकसभेत सरकारने एनआरसीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण देशभरात एनआरसीची अंमलबजावणी करणार की नाही यावर भूमिका स्पष्ट केलीय. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी देशपातळीवर नागरिकत्व नोंदणी करण्यावर सरकारचा अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं.
नित्यानंद राय म्हणाले, “नागरिकत्व दुरुस्त कायदा २०१९ बाबत १२ डिसेंबर २०१९ ला नोटिफिकेशन निघालं. हा कायदा १० जानेवारी २०२० पासून लागू झाला. आता या कायद्यांतर्गत नियम जारी केल्यानंतर सर्वांना यासाठी अर्ज करता येणार आहे. सध्यातरी सरकारने राष्ट्रीय पातळीवर नागरिकत्व नोंदणीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.”