
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे.
देगलूर:
तालुक्यातील कावळगड्डा येथील दोन शाळकरी मुले गावालगत असलेल्या नाल्याजवळील अर्धवट अवस्थेत असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली . या दुदैर्वी घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केल्या जात असून कावळगड्डा गावावर शोककळा पसरली आहे.
कावळगड्डा ता. देगलुर येथील अक्षय रोहिदास राजुरे (वय ११) हा रामचंद्र पाटील प्राथमिक शाळा देगलूर येथे इयत्ता पाचवी वर्गात शिकत होता तर प्रमोद हनुमंत राजुरे (वय १० ) हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावळगड्डा येथील चौथ्या वर्गात होता . या दोघांसोबत नागनाथ गणेश कुरे देखील होता. हे तीन अल्पवयीन शाळकरी मुले शुक्रवारी सकाळी खेळत- खेळत गावाच्या पश्चिमेकडील दिशेला असलेल्या नाल्याजवळील प्रकाश खुशालराव जाधव पाटील यांच्या शेतात अर्धवट अवस्थेतील शेततळ्या जवळ गेले. सदरील शेततळ हे पाण्याने पूर्ण तुडुंब भरलेले आहे. शेततळ्याजवळ हे तिघे मित्र आले असता नागनाथ कुरे यास शौचालय आल्यामुळे तो शौचालयास गेला. अक्षय आणि प्रमोद यांनी पोहण्यासाठी शेततळ्यात उड्या मारल्या आणि ते शेततळ्यातील गाळात रुतून बसले.सदरील घटना नागनाथ कुरे यांच्या निर्दशनास येताच तो आरडा-ओरड करत गावाकडे पळाला. लागलीच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सदरील दुदैर्वी घटनेची माहिती पोलीस व तलाठी यांना कळविण्यात आली. घटनेचा पंचनामा करून दोन बालकांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर दोन्ही बालकांचा मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्या दोन मयत बालकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील दोन अल्पवयीन शाळकरी मुलांवर असा दुदैर्वी प्रसंग ओढवल्यामुळे कावळगड्डा गावावर शोककळा पसरली आहे.