
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
अनंता टोपले
ठाण्याच्या चरई येथील जात पडताळणी कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाने माघार घेत पालघर येथे तात्काळ जात पडताळणी (अनुसूचित जमाती) कार्यालय तात्काळ सुरू करण्याचे मान्य केले. तसेच पालघर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने पालघर येथे कर्तव्यावर हजर राहण्यास लगेचच प्रयाण केले. श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनामुळे पालघर,तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा येथील आदिवासींची जात पडताळणीसाठी होणारी फरफट अखेर थांबणार असल्यामुळे आंदोलकांसह आदिवासी बांधवांनी जल्लोष केला. यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेक पंडित उपस्थित होते.
पालघर वासियांसाठी जात पडताळणी (अनुसूचित जमाती) कार्यालय पालघर ऐवजी ठाण्यात का? असा जाब विचारत आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाण्याच्या चरई
येथील सह आयुक्त तथा, उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग यांच्या कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले. पालघर येथे जात पडताळणी कार्यालय तात्काळ सुरू करावे, पालघर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने पालघर येथे कर्तव्यावर हजर राहण्यास आदेश देण्यात यावेत, तसेच शिफारशी शिवाय मागेल त्याला जात पडताळणी दाखला देण्यात यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्याचा आले आहे. आमच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी करा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.अखेर श्रमजीवी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे सह आयुक्त तथा, उपाध्यक्ष श्री अरुण कुमार जाधदव यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेक पंडित यांच्या समोर आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करून तसे पत्र देत, तातडीने पालघर साठी अधिकारी वर्ग रवाना केला. तसेच यावेळी पंडित यांनी जिल्हाधिकरी पालघर यांच्याशी फोनवरून बोलून सदर कार्यालयासाठी जागेची अडचण सांगितली असता, मान. जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा जात पडताळणी काऱ्यालासाठी उपलब्ध करून दिली.
सन 2014 साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा स्वतंत्र आदिवासी बहुल जिल्हा निर्माण करण्यात आला. या जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश असून वसईचा शहरी भाग सोडला तर सर्वच भाग हा आदिवासी क्षेत्र आहे. असे असताना या जिल्ह्यात आज 7 वर्षानंतरही अनुसूचित जमाती प्रमाणात पडताळणी व्यवस्था नाही. याच वर्षी या ठिकाणी जिल्ह्याचे भल्या मोठ्या मुख्यालयाचे उदघाटन झाले, मात्र आजही आदिवासींना दिलासा देण्यात व्यवस्था अपयशी ठरली आहे. तलासरी, मोखाडा ,जव्हार हे तालुके भौगोलिक दृष्ट्या ठाण्यापासून खूप दूर आहेत. या भागातील नोकरी साठी धडपडणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या, निवडणुकीत सहभाग घेणाऱ्या तरुणांची मोठी फरफट होत आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेने अनेकदा निवेदने देऊन देखील त्यात बदल होत नव्हता.
आज या संतप्त भावनेचा बांध फुटल्याने पालघर जिल्ह्याच्या प्रमाणपत्र पडताळणीचे काम सुरू असलेल्या ठाणे चरई येथे सुरू असलेल्या कार्यालयात श्रमजीवी संघटनेने धडक देत हे कार्यालय पालघर ऐवजी ठाण्यात का? असा जाब विचारला. या आंदोलनात पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्रस्त झालेले आदिवासी तरुण तरुणी मोठ्याप्रमाणात सहभागी झालेल्या दिसल्या. यावेळी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार, रामचंद्र रोज, राजेश चन्ने, दशरथ भालके, आत्माराम वाघे, आत्माराम ठाकरे, दिनेश पवार,निलेश वाघ, मुकेश भांगरे, महेश धांगडा,रेखा धांगडे, इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.