
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई: तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे खरिपाचे मुख्य पिक सोयाबीन उत्पादनाला मोठा फटाका बसला होता. यंदा तालुक्यातील बहुतांश प्रकल्पात, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुक्यात सर्वात जास्त हरभरा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.
ऑक्टोबर अखेरपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जमीन तयार करण्यासाठी उशिर झाला. त्यामुळे रब्बीची पेरणी करण्याला ही उशिर झाला आहे. या वर्षी शेतकरी हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करत असल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्रात लक्षणीय वाढ होतांना दिसत आहे. हरभरा नंतर ज्वारी काही प्रमाणात गहू, मका या पिकांकडे ही शेतकरी वळू लागले आहेत. यावर्षी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने
सोयाबीनचे पीक पाण्यात राहिल्याने निघालेल्या उत्पन्नातून पेरणीचा खर्च ही निघाला नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, आता विहिरी, नदी, नाल्यात तसेच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध असल्याने या हंगामात खरिपाची नुकसान भरपाई निघेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात पैसा ओतला आहे.