
दै.चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड ;तब्बल दीड वर्षांनंतर १ डिसेंबर रोजी लहान मुलांसाठी शाळांची कवाडे उघडल्याने सिल्लोड तालुक्यातील शाळांमध्ये किलबिलाट आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला, तर त्यांच्या उत्साहाला अधिक प्रोत्साहन देत अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. तर काही – ठिकाणी एसटी महामंडळाचा संप सुरू असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना इच्छा असूनही शाळेत पोहोचता आले नाही. १ डिसेंबरपासून वर्ग १ ते ४ या शाळांना शासनाने सुरू करण्याची परवानगी दिली त्या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून गटशिक्षणाधिकारी व्यंकट कोमटवार व विस्ताराधिकारी राजू फूसे यांनी तालुक्यातील असलेल्या काही शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तालुक्यात असलेल्या ३१५ जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी २१४९८ पैकी १३५१८ विद्यार्थी उपस्थित होते. यात ६३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. सर्व शाळांचे शिक्षक १०० टक्के शाळेत उपस्थित झाले.