
किल्ले साळवणचा इतिहास होणार प्रकाशित
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगेत पन्हाळा, विशाळगड, रांगणा यांसारखे प्रसिध्द 13 किल्ले आहेत. परंतू याव्यतिरिक्त जिल्ह्यात अनेक छोटे किल्ले, गढ्या व कोट आहेत. त्यांचा फारसा इतिहास पुढे आला नाही. ही उणीव ओळखून पन्हाळा येथील पर्णाल इतिहास संशोधन मंडळाने अशा गडकोटांवर भाष्य करणारी पुस्तकमाला प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे गगनबावडा तालुक्यातील किल्ले गगनगड सर्वांना ज्ञात आहे परंतू त्या मानाने उपेक्षित किल्ले साळवण राहिला आहे. विविध अभ्यासक या किल्ल्याकडे ऐतिहासिक ठाणे म्हणून पाहतात. परंतू संशोधन मंडळाच्या अभ्यासकांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेत असताना या गडाविषयी अनेक ऐतिहासिक संदर्भ प्राप्त झाले. करवीर राज्य व बावडा जहागीर यांच्यातील तंट्यामध्ये सतत केंद्रस्थानी साळवण असल्याचे दिसून येते. या ठिकाणी सध्या ब्रिटिशकाळापासून असणारी पोलीसचौकी असली तरी शिवकाळात पन्हाळा ते मालवण जोडणाऱ्या मार्गावरील महत्त्वाची साळवण चौकी होती. सांगरूळ व परिसरातील देशपांडे अमात्यांच्या परिसराला उपद्रव देत होते म्हणून त्याच्या बंदोबस्तासाठी या किल्ल्याची डागडुजी हणमंतराव नारायण यांनी केल्याची दिसून येते. या किल्ल्यावरून परिसरावर अमात्यांचा वचक बसला होता. पुढे या किल्ल्याची मामलत त्याच्याकडेच दिली. त्यांच्या तीन पिढ्या ती परंपरागत उपभोग घेत होती. महाराणी करवीरकर जिजाबाई यांनीही या गडास वेढा दिला होता तेव्हा त्यांच्या हल्ल्यात विठोजी सूर्यवंशी धारातीर्थी पडले व सीव सावंत आदी दहावीस माणसे जखमी झाली होती. इ.स.1808-09 ला निपाणीकर यांनी या किल्ल्यानजीक मुक्काम केला होता. तसेच गगनगड येथील गडकरी यांच्या अमात्यांच्या विरोधातील बंडात साळवणचा देखील समावेश होता. अमात्यांनी हे ठाणे पुनश्च जिंकून घेतले. या व याव्यतिरिक्त अशा अनेक घडामोडींबाबत प्रकाश टाकला जाणार आहे अशी माहिती अभ्यासक शिवप्रसाद शेवाळे यांनी दिली.
सध्या साळवण पोलीसचौकीमागे जांभळी आणि कुंभी नदीच्या संगमावरील छोट्याशा टेकडीवर या किल्ल्याचे अवशेष आहेत. गडावर सध्या सर्वत्र आपल्याला खापरांचे तुकडे विखुरले दिसतात. दोन्ही बाजूंची तटबंदी आज थोडीबहुत शाबूत आहे. बुरुजांचे व प्रवेशद्वाराचे अवशेष गर्दझाडीत झाकोळले गेले आहेत. गडावर भवानीमाता, महादेव मंदिर, मारुती मंदिर आदीं मंदिरे आहेत. गडाची बांधणी दोन टप्यात असून खालच्या टप्यात पाण्याची विहीर व वरच्या टप्यात बालेकिल्ला असल्याचे दिसून येतो. गडावर मोठ्या प्रमाणात बांधकामाचे अवशेष आढळून येतात. पर्णाल इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने या गडाची ऐतिहासिक व पुरातत्त्वीयदृष्ट्या मांडणी केली असून ती लवकरच पुस्तक रूपाने इतिहासप्रेमींच्या भेटीला येत आहे. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वप्नील पाटील यांनी माहिती दिली. यामध्ये मंडळाचे शिवप्रसाद शेवाळे, मृणाली शेटे, रणजीत शिपुगडे, अस्मिता भोसले, ऋतुराज काशीद, सतीश जाधव, अंकुश तेलंगे आदी अभ्यासक सहभागी
किल्ले साळवण इतिहासबाबत अनेक ऐतिहासिक घडामोडी प्रथमच मंडळाच्या वतीने इतिहासप्रेमींसमोर मांडत आहोत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील इतर छोट्या-मोठ्या किल्ल्यांवर काम पूर्ण झाले असून “कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गभांडार” या नावाने पुस्तकमालिकेतून आम्ही प्रकाशित करणार आहेत