पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा ; पोलीस अधीक्षकांना निवेदन…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील
तळणी येथील पत्रकार कैलास सिताराम पवार यांना वाळू माफिया राजू ढवळे यांने अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना तळणी – लोणाररोडवर रविवार ता.8 रोजी पहाटे पावणे सात वाजता घडली. याप्रकरणी वाळूमाफिया राजू ढवळे याच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार कैलास पवार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवार सकाळी मॉर्निंग वॉक साठी तळणी – लोणार रोडने जात असताना पाठीमागून वाळू माफिया राजू ढवळे याने स्वतः चालवीत असलेली कार क्रमांक एमएच 28 बीक्यू 8800 अंगावर घालण्याचा प्रयत्न केला मात्र, मला चाहूल लागल्याने मी रस्त्याच्या कडेला उडी मारली त्यात माझा चष्मा फुटला व थोडक्यात बचावलो. मला उडविण्याच्या नादात बाजूला असलेल्या कुडाच्या हॉटेलमध्ये कार घुसली. या संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलो असता वाळू माफिया राजू ढवळे यांने मला शिवीगाळ करत वाळूच्या बातम्या का छापतो ? असे म्हणून आज तू वाचला पण एक दिवस तुला जिवंत मारून टाकीन अशी धमकी दिली. वाळू माफिया राजू ढवळे हा गुंड प्रवृत्तीचा असून यापूर्वी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी राजू ढवळे विरुद्ध तलाठी नितीन चिंचोले यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे.तळणी – लोणार रोडवर त्याचे अवैध वाळू वाहतुकीचे टिप्पर चालतात. वाळू माफिया राजू ढवळे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी व माझे कुटुंबीय भयभीत झाले असून तात्काळ दखल घ्यावी असे पोलीस अधीक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वाळू माफिया राजू ढवळे याचे विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करून त्या जालना व बुलढाणा दोन जिल्ह्यातून हद्दपार करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर पत्रकार कैलास पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मंठा तालुका अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, संतोष दायमा, आसाराम शेळके, मानसिंह बोराडे, राघूसिंग जनकवार, रवी पाटील, पंडितराव बोराडे, रमेश देशपांडे यांच्या सह्या आहेत.