
दै चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे : महाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘पिफ डिस्टिंग्विश अवार्ड’ प्रदान करुन गौरविले.
पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल, फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कॅनडाचे कॉन्सुल जनरल मायकल वोंक आदी उपस्थित होते.
पुणे चित्रपट महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकली आहे. यापुढेही हे काम अविरतपणे सुरु राहावे यासाठी महोत्सवाला कायमस्वरूपी वास्तू असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे महापालिका सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे. जगभरात अनेक व्यवस्थांवर कोविड काळात ताण आला. मनाला वेदना देणारी ही परिस्थिती होती. मात्र महोत्सवाच्या वतीने या काळात काम केलेल्या योध्यांचा गौरव करण्यात येत आहे, हे अतिशय मोठे काम आहे. या काळात पुणे महापालिकेचे ८५ लोक मृत्युमुखी पडले. त्यांचेही स्मरण करणे गरजेचे आहे, असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सतीश मुंद्रा यांचा कोविड काळात केलेल्या कामाबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.