मनोज जरांगे पाटील यांचा गंगापुर जाहीर सभेत निर्धार…
दैनिक चालु वार्ता
गंगापुर प्रतिनिधी
गंगापूर : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताशी घेवून अंतरवली सराटी गावातून महाराष्ट्रभर रान पेटवले आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग गावागावात,घराघरात पोहोचली आहे. 40 दिवसात आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपयात जावून सकल मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत.१४ ऑक्टोबरला आंतरवाली येथे जाहीर सभा होणार असून गंगापूर तालुक्यातील प्रत्येक घरातील नागरिकांनी घरी न बसता सभेला उपस्थित राहुन एकीचे बळ दाखवा. जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर जरांगे यांची मंगळवारी (दि.११) येथील राधाकृष्ण मंगलकार्यालय येथे जाहीर सभा झाली. सभेच्या अगोदर कायगांव टोका येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळाला जरांगे यांनी भेट देऊन अभिवादन केले.पुढे जरांगे म्हणाले, ‘छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी असून येथूनच राज्याची दिशा फिरते. या सभेने आंदोलनाचे विराट रूप दाखवले आहे. मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे, देविदास वडजे, विनायक मेटे, काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले. २९ ऑगस्टला आंतरवाली सराटी येथे सुरू झालेल्या आंदोलनावर लाठीहल्ला करण्यात आला. इतके निर्दयी सरकार मी आतापर्यंत पाहिले नव्हते. मायभगिनींचे रक्त सांडल्यामुळे आता हटायचे नाही, असे ठरवले आहे. हा लढा आता थांबणार नाही. समाजाच्या लेकरांसाठी ही आरपारची लढाई आहे. परंतु असे असले तरी कुठेही गालबोट न लागता आंदोलन यापुढेही सुरूच राहील. आम्ही सरकारला वेळ दिला नव्हता, सरकारनेच वेळ मागून घेतला होता. ती वेळही आता संपत आली आहे. समाजाच्या एकाही मुलाने आत्महत्येचा मार्ग पत्करायचा नाही. तुम्ही आत्महत्या करणार असाल तर मग आरक्षण मागायचे कुणासाठी ? असा प्रश्न देखील उपस्थित केला मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी आहे. मराठा हे कुणबी असल्याचे हजारो पुरावे असल्यामुळे आरक्षणावर आमचा हक्क असल्याचे सांगत सरकारने टिकणारे आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली पाच हजार कुणबी-मराठा पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय, २००४ च्या शासन निर्णयानुसार मराठा हे कुणबी असल्याचे मान्य करण्यात आले आहे. या निर्णयाचा आधारही आरक्षणासाठी घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सभेपूर्वी मुलीने जरांगे पाटील यांचे रेखाटलेले चित्र भेट दिले . तालुक्यातून सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.