आझाद समाज पार्टीची संबंधितांवर कारवाहीची मागणी
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका १७ मुलीचा तरुणीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.रुणालय प्रशासनाने या प्रकरणी दोन डॉक्टर,दोन अधिपरिचारिका आणि एक कक्षसेविका अशा पाच जणांना नोटीस बजावल्या असून २४ तासांच्या आत स्पष्टीकरण मागवले आहे.
डॉ.तृप्ती जवादे,डॉ.अनुजा शिरभाते,अधिसेविका रिना दांडे व प्रतीमा रौराळे आणि कक्षसेवक दाऊ सारवान यांचा नोटीस जारी केलेल्यांमध्ये समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक नसल्यामुळे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद निरवणे यांच्या स्वाक्षरीनिशी ही नोटीस जारी केली असून,संबंधितांना २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान त्या तरुणीचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी होणार असल्याचे समजले,तोपर्यंत तिच्या नातेवाइकांच्या निवासाची सोयही रुग्णालय प्रशासनाने केली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील बोदेगावच्या रोशनी केशव तिडके या मुलीला बुधवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते.तापाने फणफणलेल्या अवस्थेत दाखल केलेल्या रोशनीचे हात,पाय पहाटे ३ च्या सुमारास काळे पडायला लागले होते.ही बाब तिच्या नातेवाइकांनी डॉक्टरांच्या लक्षात आणून दिली.परंतु आपण करतोय तोच उपचार योग्य आहे,असे समजून डॉक्टरांनी नातेवाईकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.तसेच ‘तुम्ही डॉक्टर आहात काय? असाल तर आमच्या खुर्चीवर बसा’ असे बोलून त्यांचा पाणउतारा केला,असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळी रोशनीला अत्यंत अस्वस्थ वाटायला लागले.तिच्या सर्वांगात आग पसरल्याचे तिचे म्हणणे होते.परंतु यावेळीही डॉक्टरांनी तिची दखल घेतली नाही.शेवटी दुपारी ३ वाजता तिचे निधन झाले.त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांसह तिथे कार्यरत सर्वाविरुद्ध रोष व्यक्त केला.दरम्यानच्या काळात आझाद समाज पार्टीचे मनीष साठे,किरण गुडधे,सनी चव्हाण,संजय गडलिंग,अनिल फुलझेले, लक्ष्मण चाफळकर,ज्योतीताई बोरकर,वंदनाताई बोरकर,मीनाताई नागदिवे,पूजा शंभरकर, आदी मंडळी त्याठिकाणी दाखल झाली.त्यांनी थेट अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल करून निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या दिला.त्यानंतर आरएमओंनी पाच जणांना नोटीस जारी करून २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले.