
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने चंदननगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनात “एक दिवस समाजासाठी’ हे अभियान राबवण्यात येत असून, त्याला शहर, उपनगर भागातून हजारो नागरिकांनी तसेच शिरूर तालुका मित्र परिवार, शिवराज तरुण मंडळ ट्रस्ट, व “आम्ही सावित्रीच्या लेकी ” या ग्रुपने जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.“जय जिजाऊ, “जय शिवराय’, “एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलने सुरू आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येत असून, तसे फ्लेक्स झळकले आहेत. काहींनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चंदननगर (पुणे ) सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे.
मराठा समाजातील नागरिकांनी भगव्या टोप्या परिधान करत “एक मराठा लाख मराठा’, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “जय भवानी जय शिवाजी’, “तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, अशी घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली. मराठा लोकांकडे मोठी शेतजमीन असल्याचे सांगून, अनेक जण दिशाभूल करत आहेत. मात्र, पूर्वीच्या काळात दोनशे एकर असणारी जमीन आता दोन गुंठ्यांवर आली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. होतकरू आणि गुणवंत मराठा मुलांना संधी मिळत नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. आता तरी आरक्षणाचा लाभ मिळावा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा मराठा सकल समाजाच्या वतीने देण्यात आला.