
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : किरतपूर साहिब इथं चंदीगड ऊना राष्ट्रीय महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी कंगनाच्या कारला घेराव घालत घोषणाबाजी केली.कंगना मनालीहून चंदीगडच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. कंगनाने माफी मागावी म्हणून शेतकरी आक्रमक होते.
शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अभिनेत्री कंगना रणौतला शुक्रवारी पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
आंदोलकांचा रोष लक्षात घेऊन अखेर कंगनानेही नमतं घेतलं. कारमधून उतरून कंगनाने त्यांची माफी मागितली.
कंगनाची गाडी अडवल्याचं कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. सुरक्षेखातर कंगनाच्या कारला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेरलं. यावेळी पंजाब पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण कंगनाने माफी मागण्याच्या आग्रहावर शेतकरी ठाम राहिले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कंगनाच्या गाडीसमोर महिलांनी संताप व्यक्त केला आणि त्यांनी माफी मागण्यास सांगितलं. सुरुवातीला शेतकऱ्यांची संख्या कमी होती, पण जसजशी लोकांना माहिती मिळाली तशी शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. यादरम्यान कंगनाने कारमध्ये बसून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाइव्ह केलं. जमाव वाढत असल्याचं लक्षात घेत कंगना गाडीबाहेर येऊन शेतकरी महिलांची माफी मागते.
एका महिलेच्या गालावर हात ठेवत कंगना म्हणाली की, “तू माझ्या आईसारखी आहेस, मला जाऊ दे. माझं वक्तव्य तुमच्याबद्दल नसून शाहीन बागबद्दल होतं”. कंगनाच्या माफीनंतर उपस्थित लोकांनी तिथेच भांगडा करण्यास सुरुवात केली. पंजाबी लोकांचं मन मोठं असतं असं म्हणत शेतकरी महिलांनी कंगनाला जाण्याचा मार्ग मोकळा केला. कंगना या मार्गावरून जाणार असल्याचं कळताच दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी तिच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. अखेर दुपारी दोनच्या सुमारास कंगनाच्या गाडीला त्यांनी घेराव घातला. सुरुवातीला वातावरण तणावपूर्ण होतं, मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवत कंगनाने माफी मागितल्यावर मार्ग मोकळा केला.