
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा
जव्हार:- गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या जागतिक महामारी संकटाने जवळपास सर्व शाळा बंद होत्या.ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुलांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.त्यातच ग्रामीण भागातील निवासी शाळा ह्या पूर्णपणे बंद असल्याने ग्रामीण शिक्षणात मोठा खंड पडल्याचे पहावयास मिळाले.या दोन वर्षाच्या काळखंडानंतर शासनाने कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळा उघडण्याची परवानगी दिली म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी व व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार आणि शिक्षण विभाग यांच्याकडून नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची कार्यशाळा विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ३ नोव्हेंबरला जव्हार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा न्याहाळे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत राजेश कोरडा यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास विषयी साध्या व सोप्या भाषेत मोलाचे मार्गदर्शन करून मुलांचा शिक्षणाविषयी उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग पाहावयास मिळाला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व्ही पी म्हस्के व शाळेचे सहशिक्षक उपस्थित होते.