
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
औरंगाबाद : काल एका एसटी कर्मचाऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. विरोधी पक्ष म्हणून सरकारला सहकार्य केलं, तरी देखील सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही.
दुसरीकडे सरकार चर्चा करायची सोडून मेस्मा लावण्याची भाषा करत आहे. मला वाटत या सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत, असे सत्तेच्या अहंकारात मदमस्त राज्यकर्ते कधी पाहिले नव्हते, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ते संघटनात्मक कार्यक्रमासाठी शहरात आले आहेत.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषण करता कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हा सरकारचा असंवेदनशीलतेचा कळस आहे. मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सहकार्य केले, मात्र सरकार दोन पावले पुढे येण्यास तयार नाही. मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत.
सत्तेच्या अहंकारात राज्यकर्ते मदमस्त
नायर हॉस्पिटलमध्ये आग लागली तेव्हा सरकारच्यावतीने कोणी बघायला देखील गेले नाही. आमच्या नगरसेवकांनी आमदारांनी विषय मांडला. त्यानंतर राज्यकर्त्यांना जाग आली आणि त्यानंतर हे बघायला गेले. सत्तेच्या अहंकारामुळे एवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधी पाहिले नाहीत,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी टीकाही यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली.