
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : कोलकाता येथे झालेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत त्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये माजी एनसीए प्रमुख राहुल द्रविडची जागा घेणार आहेत. द्रविडला नुकतेच वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
लक्ष्मण यांच्यासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक ट्रॉय कुली यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोलकाता येथे झालेल्या एजीएम बैठकीत या दोघांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडिया टीव्हीला सांगितले की, “लक्ष्मणचा करार आधीच झाला आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील दुसरी कसोटी ही त्याची शेवटची नियुक्ती आहे.
ते १३ डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे एनसीएमध्ये सामील होतील. लक्ष्मण 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजलाही जाणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने असेही उघड केले की हृषिकेश कानिटकर किंवा सध्या एनसीएचे प्रशिक्षक असलेले सीतांशु कोटक हे जागतिक अंडर-19 स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारतील. टीम इंडिया पुढील आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे.
ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या केसेसमुळे या दौऱ्यात बदल करण्यात आले आहेत. सध्या या दौऱ्यात तीन कसोटी आणि तितक्याच एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. चार टी-20 सामने नंतर खेळवले जातील, याला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दुजोरा दिला. बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी झालेल्या चर्चेनंतर T20 सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.