
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : रायफल निर्मितीचा कारखाना अमेठीत सुरू होणार आहे.उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत रायफल मुद्द्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपचा प्रचाराचा दारूगोळा या रायफलीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
अत्याधुनिक एके २०३ रायफल बनविण्यासाठी भारत आणि रशियादरम्यानच्या प्रस्तावित करारावरून गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ अमेठीचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन सोमवारी (ता. ६) भारत दौऱ्यावर येणार असून त्यात होणाऱ्या द्विपक्षीय करारमदारांतर्गत ए के २०३ रायफल बनविण्याच्या करारावरही शिक्कामोर्तब होणार असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. या कराराच्या अंमलबजावणीनंतर अमेठीमध्ये एके २०३ रायफल तयार होईल. हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असेल. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ‘मेड इन इंडिया’ धोरणांतर्गत एके २०३ रायफलचे उत्पादन होईल. मात्र अमेठीमध्ये उत्पादनाचा प्रस्ताव असलेल्या या अत्याधुनिक शस्त्राचा राजकीय लढाईत काँग्रेस विरुद्ध विशेषतः राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांविरुद्ध होण्याची भाजपची खेळी राहील असे मानले जात आहे. अमेठीत भाजपने राहुल गांधींना पराभूत करून काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. स्मृती इराणी यांच्या विरुद्ध लढताना राहुल गांधींना जिंकण्याची शाश्वती नसल्याने वायनाडमधून लढावे लागले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत ही गमावलेली जागा मिळविण्यासाठी काँग्रेसने चंग बांधला असून त्यादिशेने पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसची संघटना बांधणी करणाऱ्या प्रियांका गांधी अमेठी तसेच सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीकडे विशेष लक्ष देत आहेत. राहुल गांधीही या जागेसाठी पूर्ण ताकद झोकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यासाठी अमेठीतील काँग्रेस नेते गंगाप्रसाद यांना जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. या दुरावलेल्या पारंपरिक मतदारसंघातील मतदारांना राहुल गांधी माफीनाम्यातून भावनिक साद घालतील, असेही सांगितले जात आहे.