
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन ‘यूपीए आता आहेच कुठे?’, असा सवाल करीत काँग्रेसला डिवचले होते आणि काँग्रेस किंवा यूपीएशिवाय भाजपला नवा पर्याय देण्याचे संकेतही दिले होते. त्यावरून सध्या वादळ उठले असताना राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, काँग्रेस काही राज्यांमध्ये सत्तेत तर आहेच, शिवाय बऱ्याच राज्यांमध्ये या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. शिवसेना यूपीए किंवा एनडीए यापैकी कोणाचीही सदस्य नाही, पण भाजपला सक्षम पर्याय द्यायचा असेल तर एकास एकच दिला पाहिजे. भाजपविरोधी दोन आघाड्या झाल्या तर त्याचा फायदा भाजपलाच होईल, हे स्पष्ट आहे.
काँग्रेसला वगळून एक वेगळी आघाडी निर्माण केली गेली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल, अशी भूमिका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी शनिवारी मांडली. वैचारिक मतभेद असले तरी एकत्र येता येणे शक्य आहे, हे महाविकास आघाडीच्या पॅटर्नने देशाला दाखविले आहे, असेही ते म्हणाले.
तीन तिघाडा, काम बिघाडा कशाला? त्यातून ‘तुला ना मला घाल कुत्र्याला, असे होईल. भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व काँग्रेस सक्षमपणे करू शकत नाही, असे ममता बॅनर्जी यांना वाटते. त्यांचे काँग्रेससंदर्भात काही ग्रह आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा निश्चितच होऊ शकते. आम्ही देखील चर्चा करू, असेही ते म्हणाले.
काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार, तत्त्वज्ञान आहे. काँग्रेसला डावलणे म्हणजे तत्त्वज्ञानाला, विचाराला आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाला डावलण्यासारखे आहे.