
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- युवा मित्र संस्था आणि बजाज यांच्या सहकार्यातून जव्हार तालुक्यातील रायतळे या आदिवासी ग्रामीण भागातील विहिरीची साफसफाई करण्यात आली असून सदर विहिरीत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचून सध्याच्या परिस्थितीत पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावातील लोकांना याच विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्त्रोत उपलब्ध असल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून संभाव्य आजाराचा धोका ओळखून युवामित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्यमित्र प्रकल्पांतर्गत विहिरीतील साचलेला गाळ तसेच खराब झालेले पाणी डिझेल इंजिनाच्या साहाय्याने उपसा करून संपूर्ण विहीर स्वच्छ करण्यात आली.स्थानिक नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेसाठी स्वयंस्फूर्तीने आपले योगदान दिले.या स्वच्छता मोहीमेत विहिरीतील साचलेला गाळ/चिखल,पावसाळ्यात उगवलेले गवत बाहेर काढण्यात आले.यावेळी संस्थेकडून नागरिकांना विहिरीत टीसीएल कसे व त्याचे प्रमाण किती असावे,पाणी शुद्ध करण्याच्या घरगुती पद्धती,पाणी उकळून प्यावे,तुरटीचा वापर करावा या आणि प्रकारच्या पाणी शुद्ध करून पिण्याच्या पद्धती स्थानिक जनतेला युवा मित्र संस्थेकडून समजावून सांगण्यात आल्या.
“पाणी म्हणजे जीवन” या दृष्टिकोनातून दिवसभर चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत रायतळे गावातील स्थानिक ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभून विशेष म्हणजे युवा तरुणांनी विशेष पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीमेसाठी आपला हातभार लावला.या स्वच्छता मोहीमे वेळी युवामित्र संस्थेचे प्रकल्प समन्वयक कृष्णा बाजारे,योगेश अभंग,किरण गोरे,संस्थेच्या आरोग्यसेविका पार्वती जाधव तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे रायतळे गावातील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.