
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण झाले. अंत्यसंस्कारासाठी राजगृहातून दादरच्या भागेश्वर स्मशानभूमीत अंत्ययात्रा पोहोचली. समुद्रकिनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर बाबासाहेबांचे शव चढवले आणि ती चैत्यभूमी बनली.
या चैत्यभूमीत बाबासाहेबांच्या चितेला साक्षी ठेवून दोन लाख शोकाकूल आंबेडकरी समाजाने बौद्ध समाजाची दीक्षा घेतली होती. भदन्त आनंद कौशल्यायन यांनी या वेळी २२ प्रतिज्ञांसह बुद्धवंदना, पचंशील देऊन दीक्षा दिली होती.
चंदनाच्या चितेवर बाबासाहेबांचे प्रेत जळत होते, दुसरीकडे आसवांचा पूर वाहत होता आणि अचानक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भारावलेल्या अंतःकरणांनी शोकसभेत दीक्षा घेण्याचे आवाहन केले.
डॉ. आंबेडकर यांनी १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत दीक्षा घेण्याचा संकल्प केला होता. त्या महासूर्याच्या चितेला साक्षी ठेवून बाबांच्या लेकरांनी तो संकल्प पूर्ण केला.
सहा डिसेंबरला बाबासाहेबांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्याच दिवशी रात्री बाबासाहेबांचे शव सांताक्रूझ विमानतळावरून हिंदू कॉलनीतील राजगृहात आणले. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याची वार्ता कळताच आंबेडकरी जनतेच्या हृदयाचा बांध फुटला. हुंदके देत लोकांचे लोंढे कडाक्याच्या थंडीतही बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मिळेल त्या वाहनाने मुंबईच्या दिशेने धावत होता. सांताक्रूझ विमानतळावर हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा रात्री बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. राजगृहात बाबासाहेबांचे शव आणताच राजगृहापुढे जमलेल्या भीमसागराच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला ‘बाबा…”, स्त्रियांचा आक्रोश तर विचारूच नका. मातांनी आपली चिमुकली मुले बाबासाहेबांच्या चरणावर घातली. काहींनी तर भिंतीवर डोकी आपटली. कित्येकजणी मूर्च्छित पडल्या होत्या. प्रचंड गर्दी झाली होती तरी बाबासाहेबांचा प्रत्येक अनुयायी शिस्तीने अंत्यदर्शन घेत होता. दादरच्या भागेश्वर स्मशानभूमीत महासूर्याला सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पुत्र यशवंतरावांनी अग्नी दिला. समुद्राचा तो किनारा चैत्यभूमी नावाने पवित्र झाला. या साऱ्या आठवणींना ‘चंदनाला पुसा” या पुस्तकात नमूद करून ठेवल्या आहेत.
भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. नाव पुकारताच भारावलेल्या अंतःकरणाने दुःखी मुद्रेने कर्मवीर दादासाहेब गायकवाड उभे झाले. बोलताना कंठ दाटून आला. ते म्हणाले, काय बोलू? कस बोलू? माझ्या वाणीचा उद्गाता हरवला. १६ डिसेंबरला बाबासाहेब मुंबईत धम्मदीक्षा देणार होते. जिवंतपणी त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आली. उद्याचे कशाला आजच बाबासाहेबांच्या चितेला साक्षी ठेवून त्यांची धम्मदीक्षेची इच्छा पूर्ण करू शकतो.बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कारासमयी साऱ्यांनी हातवर करून धम्मदीक्षा घेण्यास मूकसंमती दर्शवली.