
दै.चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी आपसिंग पाडवी
मोलगी: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला खरीप हंगाम आटोपून असली (ता. धडगाव) येथील वळवी परिवारातील चार भावंडांनी ऊसतोड कामासाठी पंढरपूर गाठले. तर त्यांचाच भाऊ भगतसिंगने मात्र राष्ट्रीय पातळीवरील महा मॅरेथॉन स्पर्धा गाजवत आहे. अहमदाबाद येथे ४२.२ किलोमीटरचे अंतर अवघ्या अडीच तासात पार करीत रौप्य पदक मिळवल्यानंतर पुन्हा मुंबईतील टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावले. यातून वळवी परिवाराचा वेगवेगळ्या क्षेत्रात संघर्ष सुरू असल्याचे दिसून येते.
चौफेर दारिद्र्याचे वलय असलेल्या असली येथील वळवी परिवारातील कर्ता व्यक्ती कै. रामसिंग वळवी यांचा १४ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला, त्यामुळे दारिद्र्यात दुपटीने भर पडली. मोठ्या संघर्षाने आई फुलाबाई वळवी हे कुटुंबाचा गाडा हाकत आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला खरीप हंगामच त्यांच्यासाठी नशिबाचा राहिला. दरवर्षी हा हंगाम आटोपून परिवारातील प्रत्येक जण ऊसतोड कामाला जातात, नेहमीप्रमाणे यंदाही या परिवारातील जयसिंग रामसिंग वळवी, तुकाराम रामसिंग वळवी, जोकी रामसिंग वळवी व भारती रामसिंग वळवी हे चौघे जण पंढरपूर येथे ऊसतोड कामावर आहे. शिक्षण व घर सांभाळण्यासाठी आई फुलाबाई व भगतसिंग रामसिंग वळवी हे दोघेच घरी रहिलेत. त्यातही भगतसिंग हा धावण्याच्या शर्यतीनिमित्त नेहमीच बाहेर राहतो.
प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे भगतसिंगला धावण्याच्या शर्यतींसाठी फारसा सराव करता येत नाही. शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अपेक्षेनुसार लक्षही देता येत नाही. असे असतानाही भगतसिंग याने अनेक शर्यतींवर सातपुड्याचा ठसा उमटवला. अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या अदानी महा मॅरेथॉनच्या खुल्या हौशी गटात भगतसिंगने भाग घेतला. या शर्यतीतील ४२.२ किलोमिटरचे अंतर त्याने अवघ्या २.३३ तासात पूर्ण करीत रौप्य (दुसरे स्थान) पदक पटकावले. तर सुवर्ण पदक मिळवणारा मोहित राठोड (राजस्थान) हा काही सेकंदाच्या अंतरानेच पुढे राहिला. यांची चर्चा सुरू असतानाच पुन्हा भगतसिंने एका विक्रमाला गवसणी घातली. मुंबई येथे झालेल्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावला. ही स्पर्धा ३५ किलोमीटरची असून हे अंतर त्याने २ तास १८ मिनिटांत पूर्ण केले. या दोन्ही स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या राज्यातील विख्यात धावपटूंचा समावेश होता, त्यातून पहिले व दुसरे स्थान मिळवणे हीच या ऊसतोड परिवाराची खरी मिळकत ठरत आहे.
◾नंदुरबार रनर्थने आणले उजेडात:-
भगतसिंग वळवी हा नंदुरबार येथील पी.के.पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्रातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेत असताना फेब्रुवारी २०२० मध्ये मुंबई येथे झालेल्या या स्पर्धेत ‘नवापूर-नंदुरबार रनर्थ’ या (सहा जण) संघाच्या माध्यमातून भाग घेतला. १८२ किलोमीटरची ही शर्यत १२ तासात पूर्ण करायची होती, हे लक्ष भगतसिंगने सहज गाठले. या स्पर्धेत प्रभावी ठरलेला भगतसिंग वळवी हा विप्रोचे अधिकारी तथा मुळचे उमरपाटा ता. साक्री येथील रहिवासी अकेश कुवर (रनर्थचाच घटक) यांच्या नजरेत आला. त्यांनी आर्थिक बळ देत भगतसिंगला वेगवेगळ्या स्पर्धेत उतरवले अन् त्यानेही प्रत्येक शर्यतीत समाधानकारक कामगिरी केली.
प्रतिक्रिया-
१)
शिक्षण घेण्यासारखे घरचे वातावरण अनुकूल नव्हते, असे असतानाही मोठ्या भावाने आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. दरम्यान भूक भागवण्यासाठी मीही असलीच्या आश्रमशाळेत जात होतो, तेथे चौथीत शिकत असताना वडिलांचे निधन झाले. आमचे पालनपोषण मोठ्या मुश्किलीने आईनेच केले. स्थलांतर, काबाडकष्ट हे तर माझ्या परिवाराच्या पदरी पडलेले नशिबच आहे.
-भगतसिंग वळवी, सुवर्ण पदक प्राप्त धावपटू, असली ता. धडगाव
२)
प्रतिकूल परिस्थितीतही कुठल्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आहे. जातीच्या आधारावर नोकरीस लागणाऱ्या आदिवासींनी होतकरुंना मदत करीत आपली सामाजिक बांधिलकी जपावी. ज्यामुळे गरिबीचा कलंक पुसला जाईल.
-अकेश कुवर, वरिष्ठ अभियंता, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, विप्रो लि. मुंबई