
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
शहादा येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील पाच बसेस पोलीस बंदोबस्तीत रवाना
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील बारा वाहक व पाच चालक असे सतरा कर्मचारी काल कामावर हजर झाल्याने आगारातून पाच बसेस पोलीस बंदोबस्तीत रवाना करण्यात आल्या.
गेल्या महिनाभरापासून विलीनीकरणाच्या मागणीवर संपावर ठाम असलेल्या कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे शहादा आगाराला दररोज सहा ते सात लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे समजते. विलीनीकरणाच्या मागणीवरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एस टी महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. परिणामी लाल परी ची सेवा सर्वसामान्यांसाठी गेल्या महिनाभरापासून बंद होती. शहादा आगारातील बारा वाहक व पाच चालक असे सतरा कर्मचारी आज स्वतःहून कामावर हजर झाले आगार प्रमुख योगेश लिंगायत व सहकाऱ्यांनी धुळे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहता आज पोलीस बंदोबस्तात शहादा- धडगाव, शहादा-खेतिया,शहादा- जयनगर, शहादा- शहाणा, शहादा- खेतिया अशा एकूण पाच बसफेऱ्या आज सोडण्यात आल्या असून शहादा आगारातील सर्व परिसरातील बससेवा सुरू होईल का? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.
चौकट:- शहादा आगारात कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया.
शाळेकरी मुल, वृद्ध महिला व पुरुष लहान बालके व इतर प्रवाशांचे हाल व आमच्या कुटुंबांचे आर्थिक उपजीविकेचे प्रश्न हे सर्व पाहता कोणाच्या दबावाखाली न येता स्वेच्छेने आज कामावर आलो आहोत.
सकाळपासूनच बसस्थानकात आगार प्रमुख योगेश लिंगायत स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत तळ ठोकून होते कर्मचाऱ्यांचा कामावर हजर होण्याचा निर्णय झाल्यानंतर आगारातर्फे प्रवाशांसाठी बससेवा सुरू करण्यात येत आहे असा ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले.
प्रवाशांनीही उत्तम प्रतिसाद दिल्याने पोलिसांच्या बंदोबस्तीत सकाळी दहा वाजता या पाचही एक मागे एक बसेस रवाना करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांचे कामावर हजर होण्याचे प्रमाण पाहता तसेच प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल त्या तुलनेत इतर मार्गांवरील सेवा सुरू करण्यात येतील. अशी माहिती आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी दिली. शहादा आगारात पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत सह विशेष कर्मचाऱ्यांचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.