
दैनिक चालु वार्ता , शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील चौगाव येथे “जागतिक मृदा दिन” ५ डिसेंबर राजी साजरा करण्यात आला. जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून “जमिनीची क्षारपडता थांबवा, जमिनीची उत्पादकता वाढवा” या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ दिनेश नांद्रे (कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र धुळे) यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषिभूषण श्री दिलीप पाटील (सेंद्रिय शेती) हे उपस्थिती होते. डॉ अतिश पाटील (शास्त्रज्ञ, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच डॉ पंकज पाटील (शास्त्रज्ञ, पीक संरक्षण विभाग), श्री वृषभ गोरे (ग्रँड मराठा फाउंडेशन) इ प्रमुख मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षणीय भाषणात डॉ दिनेश नांद्रे (कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र धुळे) यांनी शाश्वत पिक उत्पादनासाठी जमिनीच्या आरोग्याच्या संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले. त्याचबरोबर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिली. शेती करत असताना मशागती बरोबरच संतुलित खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करणे तितकेच गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. अलीकडच्या काळामध्ये जमिनीच्या आरोग्याची प्रत घसण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनियोजित आणि अतिरिक्त पाण्याचा वापर हे आहे. जमिनीची प्रत सुधारण्यासाठी आपल्याला आधुनिक सिंचन पद्धती जसे ठिबक सिंचन तुषार सिंचन इत्यादींचा वापर करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खताची मात्रा दिल्यास पाणी आणि खतांमध्ये सुद्धा बचत होते. शेतीबरोबर कृषी आधारित जोड व्यवसायाची सांगड घातल्यास नक्कीच शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटू शकतात असे डॉ दिनेश नांद्रे म्हणाले.
डॉ अतिश पाटील (शास्त्रज्ञ, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग) यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणामद्धे सेंद्रिय खतांचा अभाव, अतिरिक्त पाणी आणि बेसुमार रासायनिक खतांच्या वापरामुळे चांगल्या सुपीक जमिनीचे रूपांतर क्षारपड जमीन मध्ये होत आहे असे मत व्यक्त केले. क्षारपड जमिनी आता जागतिक समस्या बनली आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीत खत मात्रा द्यायला हव्यात. तसेच पिकांची आणि वाणांची निवड करताना ती पिके क्षार संवेदनशील आहेत की, क्षार सहनशील आहेत याचे माहिती घेऊन पेरणी करावी. मातीच्या आणि पाण्याच्या संवर्धनासाठी जमिनीची योग्य मशागत करून बांधबंदिस्ती करून घ्यावी. तसेच शेतातील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी उताराला अनुसरून चर काढून घ्यावी, असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना डॉ अतिश पाटील यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून केले.
कृषिभूषण श्री दिलीप पाटील म्हणाले कि मातीच्या आरोग्य नुसार मानवाचे आरोग्य असे सहज जीवन चक्र आहे. परंतु वर्तमानामध्ये रासायनिक खते, कीडनाशके यांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे ही आता काळाची गरज बनली आहे. सेंद्रिय कर्बाची पातळी वाढविण्यासाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करायला हवा असे त्यांनी आवाहन केले. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी आणि त्याच्यात वाढ करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे हि आता काळाची गरज आहे असे श्री दिलीप पाटील म्हणाले.
शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले
डॉ अतिश पाटील (विषय विशेषज्ञ, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, धुळे) यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना माती आणि पाणी परीक्षणाचे महत्व पटवून दिले. त्याचबरोबर माती तपासणीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. हंगामी पिके तसेच फळबागेतील मातीचा नमुना गोळा करण्याची आदर्श पद्धत उपस्थित शेतकर्यांना दाखऊन दिली. प्रत्येक हंगामात पेरणी करण्यापूर्वी तसेच फळबाग लागवड करण्यापूर्वी शेतातील मातीचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. माती परीक्षण अहवालावरून खतांचे व्यवस्थापन केल्यास पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात, जमिनीचे आरोग्य सुस्थितीत राहते त्याचबरोबर शाश्वत उत्पादनाची हमी मिळते असे डॉ अतिश पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कमलाकर गर्दे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री प्रमोद बागले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी, भूमिपुत्र सेंद्रिय उत्पादित गट चौगाव त्याचबरोबर युवा शेतकरी विनोद पाटील, रामभाऊ मोरे, आबा महाले, मनोज मासुळे, सातूलाल सोनवणे, ज्ञानेश्वर शेवाळे इ. मोलाचे सहकार्य लाभले.