दैनिक चालु वार्ता,शहादा,
प्रतिनिधि : क्रिष्णा गोणे.
शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच नव्याने आलेल्या ‘ओमिक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ८ ते १० डिसेंबर या कालावधीत ‘कोविड-१९’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर तीनदिवसीय मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेत आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधी, महसूल, पोलिस विभागासह शासनाचे सर्व विभाग, सामाजिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती देताना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, की ८ ते १० डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे ग्रामीण व शहरी भागात विशेष लसीकरण शिबिर होईल. शिबिराच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सातपुडा पर्वतातील पाड्या पाड्यांपर्यंत पोचविण्यात येईल. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नंदुरबार जिल्ह्यात ‘कोविड’ आवश्यकता आहे. नागरिकांनी लसीकरण मोहिमेला गती देण्यात येत लसीकरण करून घेत सहकार्य करावे.