
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा तालुक्यातील माकणी येथे( दि.६.१२.२०२१):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महापुरुष होते. त्सांचे व्यक्तिमत्त्व हिमालयाहून उत्तुंग व महासागरासारखे अथांग होते. ते विसाव्या शतकातील ज्ञानपुरुष असून ज्ञानक्षेत्रातील आदर्श व प्रेरक महापुरुष होते, असे प्रतिपादन ॲड. राजेंद्र लातूरकर यांनी केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेच्या कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजिलेल्या अभिवादन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेड़े हे उपस्थित होते.
अभिवादन समारंभाच्या आरंभी प्रमुख पाहुणे व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. राजेंद्र लातूरकर यांचा शाल व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
आपल्या अभ्यासपूर्ण व प्रवाही भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान ज्ञानपुरुष होते. कोलंबिया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या शतावधी वर्षांतील विद्यार्थ्यांच्या प्रभावळीत कुशाग्र विद्यार्थी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांत प्रथम क्रमांकावर असल्याचे जाहीर झाले आहे.
त्यांनी कोलंबिया , लंडन स्कूल ऑफ़ इकॉनॉमिक्स , ग्रेज इन व बॉन या विश्वविख्यात विश्वविद्यापीठांतून अखंड ज्ञानसाधना केली. ज्ञानाची भूक भागवण्यासाठी त्यांनी आपली पोटाची भूक मारली .त्यांनी ज्ञानोपासनेलाच प्रथम प्राधान्य दिले . दिवसाचे सोळा ते अठरा तास अखंड अध्ययन करून त्यांनी ज्ञानसागरातील अत्युच्च पदव्या संपादन केल्या आणि जागतिक स्तरावरील विद्वान म्हणून बहुमान मिळविला . त्यांनी संपादन केलेले ज्ञान हे विशेषत: समाजहितार्थ तथा देशहितार्थ उपयोगात आणून अत्यंत स्पृहणीय कार्य केले आहे. समाजहित तथा देशहित साधण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारा त्यांच्यासारखा महापुरुष शतावधी वर्षांतून एकदाच जन्माला येतो , अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची व जीवनकार्याची थोरवी विशद केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे यांनी आपल्या समारोपीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा , त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीचा तथा लोककल्याणकारी कार्यकर्तृत्वाचा सर्वांनी आदर्श
घेण्याची नितांत आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. एस. डी.कांबळे यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. काकासाहेब सुरवसे यांनी करून दिला . प्रा. डॉ. एस. ई.मुंढे यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी. एस. एस.महाविद्यालयातील प्राध्यापक , प्रशासनातील अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या समारंभाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी , निमंत्रित , स्थानिक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.