
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी नांदेड बाजीराव गायकवाड
मुंबई:- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, येत्या 4 मार्च 2022 रोजी बारावीची, तर दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होणार असल्याचे मंत्री गायकवाड यांनी जाहीर केले आहे..
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्य सरकारने सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. गेल्या वर्षी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष मूल्यांकन पद्धतीने मार्क्स दिले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे..कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी ओमायक्रॉनचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे यंदा तरी दहावी-बारावीच्या परीक्षा होणार का, झाल्या तर कधी नि कशा होणार..? याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. कोरोना संसर्ग कमी झाल्यापासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरु झाल्या आहेत. दहावी-बारावीचेही वर्ग प्रत्यक्ष भरत आहेत. त्यामुळे या शैक्षणिक वर्षातील दहावी-बारावीच्या परीक्षांची अधिकृत घोषणा मंत्री गायकवाड यांनी केली.मंत्री गायकवाड यांच्या माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान, तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे. या सगळ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याचे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले..वेळापत्रकानुसार बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत होणार आहेत. त्यानंतर 4 मार्चपासून लेखी परीक्षांना सुरुवात होईल.माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 दरम्यान होतील. बारावीच्या परीक्षांचा निकाल जून 2022 मध्ये जाहीर होऊ शकतो..
दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 दरम्यान होतील. 15 मार्चपासून लेखी परीक्षा सुरु होईल. प्रात्यक्षिक, श्रेणी/तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 5 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील.दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा 5 एप्रिल ते 19 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल जुलै 2022 च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत केंद्र व राज्य शासनाने, तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.