
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ४५ हजार ७४ शेतकऱ्यांना ३४२ कोटी ७२ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी शासनाने सत्तास्थापनेनंतर शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ जाहीर केली. यात ज्या शेतकऱ्यांकडे एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदत पीककर्जाची ३० सप्टेंबर २०१९ ला मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम होती अशा अल्प, अत्यल्पभूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची घोषणा केली होती.
पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सनियंत्रण समितीची स्थापना झाली. राज्य शासन, योजनेचे मध्यवर्ती पथक, पुणेस्थित सहकार आयुक्त व निबंधकांच्या मार्गदर्शनानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ऑनलाइन पद्धतीने राबविली. धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुका मिळून ४९ हजार ८०१ कर्जखाती अपलोड केली. आधार प्रमाणीकरण झालेल्या खात्यांची संख्या ४५ हजार ६०२ होती. आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित खातेदारांना वेळोवेळी संधी दिली. तक्रार असलेल्या खात्यांची जिल्हास्तरीय समिती व तहसीलदारांच्या माध्यमातून निवारण केले. जिल्ह्यात अद्यापही ५८२ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे, असे जिल्हा उपनिबंधक देशपांडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील तालुकानिहाय कर्जमुक्त शेतकऱ्यांची संख्या व एकूण रक्कम (अनुक्रमे तालुका, लाभ रक्कम वितरित झालेली शेतकऱ्यांची खाती, एकूण रक्कम कोटींमध्ये) : धुळे- १६३७१, ११९.२२, साक्री- १११२१, ८७.३८, शिरपूर- ६२४६, ५१.१४, शिंदखेडा- ११३३६, ८४.९८.