
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदीप मोरे
‘
नातेवाईक, वारसांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन
नंदुरबार: कोविड-19’ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईक व वारसांशी संपर्क साधुन त्यांचेकडून सानुग्रह अनुदानासाठी अर्ज व सहाय्यासाठी तालुकास्तरावर समिती गठीत केली असून मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईक, वारसांनी तातडीने ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
कोविड-19 आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह अनुदान देण्याकरिता मदतीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत केली असून समितीचे अध्यक्ष तहसिलदार असून वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपंचायत, गट विकास अधिकारी हे सदस्य असतील.
या तालुकास्तरीय समितीने तालुक्यातील आयसीएमआर पोर्टलवर कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या यादीनुसार गावांची विभागणी करुन समिती सदस्यांना गावे वाटप करावी. समिती सदस्यांनी त्यांचे विभागामार्फत सदर गावातील आयसीएमआर यादीनुसार मयत व्यक्तींचे निकट नातेवाईकांशी संपर्क साधून कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांनी पोर्टलवर सानुग्रह सहाय्य प्राप्त होण्यासाठी अर्ज भरला आहे किंवा कसे याची खातरजमा करेल. अर्ज भरला नसल्यास खालील कागदपत्रे,माहितीसह सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत सीएससी-एसपीव्ही मधून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यास सहाय्य करावे.
मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईकांनी अर्जदाराचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड (पीडीएफ, जेपीजी), मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी), मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बॅंक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बॅंक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी) आणि मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, जर वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस ‘कोविड-19’ चे निदान झाले, अशी कागदपत्रे अपलोड करावे.
या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळविण्यासाठी लॉग इन करता येईल. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in वर Document Required या टॅब वर उपलब्ध आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी म्हटले आहे.