
दैनिक चालू वार्ता
जिल्हा प्रतिनिधी (विश्वास खांडेकर )
माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे आयुष्य होय. माणसाचे शरीर धडधाकट असेल तर इतर संपत्ती पेक्षाही ते महत्त्वाचे मानले जाते, पैशापेक्षा शरीर महत्त्वाचे या शरीराच्या समृद्धीला’ शरीर संपदा’ असेदेखील म्हटले जाते.
भारतीय साहित्यामध्ये या शरीरसंपत्तीला फार महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. सुमारे 3000 वर्षापूर्वी देखील मनुष्याने सुदृढ शरीर यालाच महत्त्व दिले आहे. हे शरीर सुदृढ करण्याकडे अनेक पद्धती आणि उपचाराद्वारे पाहिले जाते, काही वैदिक पद्धती आहे तर काही मानसिक पद्धती आहेत. परंतु हा सर्व भाग वैद्यकशास्त्रात अंतर्भूत केला जातो.
योगाला देखील आजकाल फार महत्त्व प्राप्त झाले आहे. योगाची परंपरा देखील हजारो वर्षापासून भारतात चालत आलेली आहे, योग म्हणजे “योगश्चित्त वृत्ति निरोधः” असे म्हटले जाते, मनाचे आणि स्वभावातील सर्वदोश नष्ट करणे हाच योगाचा प्रथम मूलमंत्र आहे. तर मन आणि स्वभाव जर निरोगी असेल तर मनुष्याचे शरीर देखील आपोआपच निरोगी राहते, असे देखील योगात सांगितलेले आहे .
भारतीय आयुर्वेदाचा मूळ जर पहावयाचे असेल तर याची सुरुवात अथर्ववेदातुन झालेली दिसून येते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, या वेदांमध्ये नैसर्गिक शक्तींची वर्णने आलेली आहेत. परंतु अथर्व वेदामध्ये मानवाच्या आयुष्यातील स्वस्थता आणि सुख यांचा विचार केला गेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या आणि इच्छांची पूर्तता या वेदात संग्रहित केली गेली आहे. या वेदाचे दोन प्रमुख अथर्व आणि अंगिरस नावाचे दोन ऋषी, अथर्व ऋषींनी रोगांचा नाश करणारे अनेक मंत्रांचा आणि औषधांचा उल्लेख ह्या अथर्व वेदांमध्ये केला आहे. खोकला, राजयक्ष्मा, ज्वर अशा नानाविध रोगाचा उल्लेख अथर्ववेदातून आढळून येतो. म्हणून वैद्यक शास्त्राचे मूळ अथर्ववेद मानले जाते, आज देखील ‘ओरिसा राज्यात’ या वेदाला फार महत्त्व प्राप्त आहे. येथील अनेक परंपरा अथर्व वेदा नुसारच आहेत, तेथील नित्य नैमित्तिक कर्म अथर्ववेदा नुसारच केली जातात , पुढे या अथर्ववेदा पासून वैदिक शास्त्राचा विकास होत गेला आणि त्याला ‘आयुर्वेद’ असे नाव पडले, आता आपण ह्या लेखा मार्फत आयुर्वेदा विषयी थोडीशी माहिती मिळवणार आहोत.
आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे,” *काश्यप संहीता आणि ब्रह्मवैवर्त पुराणात”* आयुर्वेदाला पाचवा वेद मानले गेले आहे. यावरूनच आयुर्वेदाचे महत्त्व आपल्या लक्षात येते, जगातील सर्व चांगल्या कार्यात धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष यांची सिद्धता शरीर आणि दीर्घायुष्या द्वारे होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. त्याबाबत एक श्लोक देखील प्रसिद्ध आहे
*आयुः कामयमानेन धर्मार्थसुखसाधनम्।
आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः।।*
शरीर, इंद्रिय, मन आणि चेतना, धातू ,आत्मा या साऱ्यांचा सहयोग म्हणजेच आयुष्य होय. या आयुष्या संबंधीच्या संपूर्ण ज्ञानाला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेद ही एक केवळ एक उपचार पद्धती नाही तर एक आदर्श जीवन शैली आहे. आयुर्वेदात 75000 आयुर्वेदाचार्यांची नावे आली आहेत.
आशा आयुर्वेदा विषयीची पुढील माहिती आपण दुसऱ्या लेखातून घेणार आहोत