
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याच्या नातेवाईकाने 33 लाख रुपयांची रक्कम सायबर पोलिसांकडे जमा केली. सुपेने हातऊसने दिलेली पाच लाख रुपयांची रक्कमही त्याच्या मित्राने पोलिसांचा धसका घेऊन सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे परत केली. त्यामुळे सुपेकडे आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. “टीईटी’ परीक्षेच्या गैरव्यवहारामध्ये सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर सायबर पोलिसांनी सुपे व शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी सुपेच्या घरी, त्याची मुलगी व जावयाच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना आत्तापर्यंत अडीच कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती.
दरम्यान, या प्रकरणामध्ये सुपेला अटक केल्यापासूनच सुपेने पैशांच्या दोन बॅगा कोणाला तरी दिल्या असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणासंबंधी नागरीकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते. सुपेने अटक होण्याच्या दहा दिवसांपुर्वी त्याच्या एका नातेवाईकाकडे दोन बॅग दिल्या होत्या. संबंधित नातेवाईकाने त्या बॅग थेट सायबर पोलिसांकडे आणून जमा केल्या. पोलिसांनी बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये 33 लाख रुपयांची रोकड आढळून आली.दरम्यान, सुपेने त्याच्या एका मित्राला पाच लाख रुपये हातऊसने दिले होते. सुपेच्या अटकेच्या बातम्या सगळीकडे पोचल्या. आपल्यावरही पोलिस कारवाई करतील, या भितीपोटी त्या व्यक्तीने पाच लाख रुपये पोलिसांकडे जाम केले. सुपे याच्या लष्कर परिसरातील कार्यालयाची पोलिसांनी बुधवारी झडती घेतली होती. त्यामध्ये काही महत्वाची कागदपत्रे व 24 लाख रुपयांची रक्कम पोलिसांना आढळून आली होती. पोलिसांना आत्तापर्यंत सुपेकडून तीन कोटी रुपयांपर्यंतची रोकड, कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले आहेत.