
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी केंद्रे प्रकाश
भारत आणि त्याच्या 1,500 किलोमीटरच्या परिसरातील दिशादर्शनविषयक मदतीसाठी सात उपग्रहांच्या समूहाचा वापर करण्यासाठी इस्रोने विकसित केलेल्या नेविक या अॅपसाठी लागणाऱ्या रिसिव्हर मॉयड्यूल्सचा विकास आणि उत्पादन भारत लवकरच करणार आहे. जीपीएस प्रणालीसाठी देखील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या तंत्रज्ञानाचा आणखी विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून भारताला इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली संरेखनातील जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वैधानिक संस्था असलेल्या टीडीबी अर्थात तंत्रज्ञान विकास मंडळाने हैदराबाद स्थित, मंजीरा डिजिटल सिस्टिम्स या डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमधील संशोधन आणि विकास कंपनीला आर्थिक मदत करण्यासाठी मंजुरी दिली आहे. नेविक अॅपसाठी आवश्यक असलेल्या रिसिव्हर मॉयड्यूल्सचे घाऊक प्रमाणात उत्पादन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात आणि आर्थिक स्वावलंबनाच्या क्षेत्रात भारताची तंत्रज्ञानविषयक आघाडी स्थापित करण्यास मदत होईल.या कंपनीने पेटंट घेतलेल्या युनिव्हर्सल मल्टीफंक्शनल अॅक्सिलरेटरचा (UMA)वापर करून बेसबँड प्रोसेसरचे संरेखन आणि निर्मिती केली आहे. हे युनिव्हर्सल मल्टीफंक्शनल अॅक्सिलरेटर वापरून अनेक डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमधील अनेक साधनांची निर्मिती करता येते.
“टीडीबीने स्टार्ट अप्स, एमएसएमई किंवा सुस्थापित कंपन्या अशा सर्वच तंत्रज्ञानविषयक कार्य करणाऱ्या कंपन्यांच्या वाढीसाठी उपयुक्त परिसंस्था विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सेमीकंडक्टर्स, हरित हायड्रोजन, संरक्षण, हवाई क्षेत्र आणि तत्सम राष्ट्रीय हिताच्या इतर तंत्रज्ञान विकासातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज असतो.” टीडीबीच्या आयपी आणि टीएएफएस विभागाचे सचिव राजेश कुमार पाठक यांनी सांगितले.
कंपनीचे प्रमुख डॉ. वेणू कंदादै म्हणाले, “ या क्षणी टीडीबीने दिलेले पाठबळ अत्यंत योग्य वेळी केलेली आणि स्वदेशी उत्पादनांच्या विकास आणि व्यावसायिक पातळीवरील प्रसाराच्या प्रयत्नांना अधिक वेग आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. इलेक्ट्रॉनिक चिपचे संरेखन आणि विकास या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी देशाने हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये मंजीरा कंपनी देखील इलेक्ट्रॉनिक चिपचे संरेखन आणि विकास करण्याचे नियोजन करून सहभागी होत आहे.”